सुषमा स्वराज यांचे ते भाषण संस्मरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:46 PM2019-08-07T23:46:53+5:302019-08-07T23:47:42+5:30
सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषण यवतमाळकरांच्या आजही स्मरणात आहे.
स्वराज यांच्या राहणीतील साधेपणा आणि उच्चविचारांनी यवतमाळकर भारावून गेले होते. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वाढवून प्रगती कशी करावी, या विषयावर त्या बोलल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी या विषयावर मार्गदर्शन केले.
सुषमा स्वराज यांच्या वक्तृत्वाने सारेच भारावून गेले होते. त्यांच्या मौलिक विचाराने अनेक युवतींच्या आयुष्याला दिशा मिळाली. यामुळे त्यांचे भाषण आजही प्रत्यक्षदर्शींच्या स्मरणात आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव कायम आहे. त्यांच्या कार्यशैलीतून अनेकबाबी त्यावेळी यवतमाळकरांना शिकायला मिळाल्या. त्यावेळी सुषमा स्वराज यवतमाळात दोन दिवस मुक्कामी होत्या. अस्मिता या स्मरणिकेचे प्रकाशन त्यांनी केले. त्यांनी स्वत: निरोप घेताना आदरातिथ्याचे कौतुक केले. यावेळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म.ल.काशीकर, सचिव रमेश मुणोत, अॅड .श्रीहरी अणे, राजाभाऊ ठाकरे, अरूण अडसड, हरिभाऊ तत्त्ववादी, मनोहर धर्माधिकारी, दिवाकर पांडे आदी स्वागतासाठी पुढे आले होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. त्या आम्हा महिलांसाठी आदर्श होत्या. स्पष्ट बोलणाऱ्या आणि त्या बोलण्यातून कुणालाही न दुखविणाºया त्या होत्या. त्यांच्या वक्तृत्वाने मी भारावून गेले होते. आजही त्या माझ्यासाठी आदर्श आहेत.
- डॉ. कविता तातेड, प्राध्यापक, अणे महिला विद्यालय