फुबगाव, घनापूर पुनर्वसनाला वेग
By admin | Published: February 8, 2017 12:23 AM2017-02-08T00:23:24+5:302017-02-08T00:23:24+5:30
डोल्हारी-टाकळी मध्यम प्रकल्पातील बाधित फुबगाव आणि घनापूर या गावांच्या पुनर्वसनाच्या कामाला चांगला वेग आला आहे.
अधिकाऱ्यांचा पुढाकार : डोल्हारी-टाकळी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी
मुकेश इंगोले दारव्हा
डोल्हारी-टाकळी मध्यम प्रकल्पातील बाधित फुबगाव आणि घनापूर या गावांच्या पुनर्वसनाच्या कामाला चांगला वेग आला आहे. घनापूरची जागा निश्चित झाली असून संयुक्त मोजणीसुद्धा आटोपली तर फुबगावसाठी योग्य जागा शोधण्याचे काम सुरू आहे. बऱ्याच कालावधीनंतर पुनर्वसन कार्याला वेग आल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड यांनी या कामाला प्राधान्य दिले. त्याचबरोबर पुनर्वसनाकरिता अभियंता एस.पी. पवार यांची नियुक्ती केली. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून लवकरच दोन्ही गावच्या नागरिकांना योग्य ती जागा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डोल्हारी-टाकळी प्रकल्पाला २४ आॅक्टोबर २००८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्पाची प्रारंभिक किमत १२२.१५ कोटी होती. त्यानंतर दरवाढीमुळे ती २३३.८७ कोटी करण्यात आली. अडाण नदीवर डोल्हारी व उदापूर या गावाजवळ प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात दारव्हा तालुक्यातील फुबगाव, घनापूर तर नेर तालुक्यातील उदापूर ही गावे पूर्णत: बाधित होणार आहे. एकतर प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे तर दुसरीकडे गावांच्या पुनर्वसनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिल्या जात नव्हत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी होती.
परंतु या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर गणेश राठोड यांनी या कामाकरिता पुढाकार घेतला. तसेच पुनर्वसन कार्यासाठी अभियंता एस.पी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सध्या या कार्याला चांगला वेग आला आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार घनापूरकरिता दारव्हा शहरालगत अत्यंत सोयीच्या जागेची निवड करण्यात आली. या गावची पूर्णत: बाधित संख्या ४७७ असून त्याकरिता २२ हेक्टर जागेची आवश्यकता होती. जागा निश्चितीकरिता घनापूरकरांची मागणी आणि शहरालगतच्या शेतकऱ्यांची पुनर्वसनासाठी महागडी शेती देण्याच्या तयारीसाठी अभियंता एस.पी. पवार यांनी मेहनत घेतली.
फुबगावसाठी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन जागेचा शोध सुरू आहे. दोन जागा पाहण्यात आल्या. त्यापैकी एक निश्चित करून फुबगावची देखील पुनर्वसन प्रक्रिया मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.