पुसद तालुक्यात भुईमूग काढणीला वेग
By admin | Published: May 27, 2017 12:18 AM2017-05-27T00:18:55+5:302017-05-27T00:18:55+5:30
तालुक्यात सध्या उन्हाळी भुईमूग काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. यावर्षी उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यात सध्या उन्हाळी भुईमूग काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. यावर्षी उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. मागील वर्षी एकरी दहा क्विंटल प्रमाणे उत्पादन झाले होते. यावर्षी मात्र चार क्विंटलचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहे.
तालुक्यात अनेक शेतकरी उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड करतात. दरवर्षी यातून त्यांना चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी मोठी मदत होते. भुईमूगाला भावदेखील दरवर्षी चांगला मिळतो. यावर्षी मात्र उत्पन्न कमी झाले असून याला भावसुद्धा चांगला मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. अनेकांची तर भुईमूग लागवडीसाठी लागलेला खर्च आणि मजुरीदेखील निघत नसल्याने ते अडचणीत सापडले आहे. तालुक्यात निंबी, पार्डी, भोजला, जांबबाजार, वालतूर रेल्वे, वन कारला, मोखाड, चिखली कॅम्प, मरसूळ, वालतूर तांबडे, वरूड, नंदपूर, मोहा, आरेगाव, काटखेडा, हुडी, हेगडी, कार्ला, माणिकडोह, बोरगडी, शेलू, बोरी, सांडवा, मांडवा, हर्षी, गौळ, चिलवाडी, पोखरी या गावांसह इतर गावांमध्ये भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी शेतात भुईमूगाचे पीक सुरुवातीला चांगले दिसत असले तरी प्रत्यक्षात आता मात्र उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे येत्या हंगामात पेरणीसाठी लागणारा खर्च कसा उभारावा, याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे.
भुईमूग हे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे शेतकरी त्याची लागवड करतात. एकरी २५ ते २० हजार रुपये या पिकाला लागवड खर्च येतो. दोन ते तीन विहिरींचे पाणी एकत्रित करून त्याची निगा राखल्या जाते. तसेच या भागात असलेल्या वन्यप्राण्यांच्या लागवडीतून त्याची काळजी घ्यावी लागते. एवढे करूनसुद्धा त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी निसर्गाने आवश्यक ती साथ न दिल्याने शेतकऱ्यांचा भुईमूग पिकापासूनही अपेक्षाभंग झाला आहे.