सुसाट धावणाऱ्या ट्रकने ऑटोला उडविले, मायलेकी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 08:08 PM2023-04-06T20:08:28+5:302023-04-06T20:08:34+5:30
आबई फाट्यावरील घटना, सात जखमी.
वणी (यवतमाळ) : तालुक्यातील शिंदोला येथून मोहदाकडे सुसाट वेगाने येत असलेल्या एका ट्रकने वणी येथून शिंदोलाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला उडविले. या भीषण अपघातात मायलेकी जागीच ठार झाल्या, तर ऑटोतील सात प्रवासी जखमी झाले. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वणी-कोरपना मार्गावरील आबई फाट्यावर घडली. मायलेकीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संजीवनी अनंता नागतुरे (३५), अवनी अनंता नागतुरे (४) रा. कुर्ली अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नावे आहेत. या अपघातात दर्शना प्रकाश मडावी (४०), प्रकाश रमण मडावी (४५) दोघेही रा. बेलोरा (जि.गडचिरोली), अंबादास नामदेव जिरे (५०), संगीता अंबादास जिरे (४५), शिवाणी सुधाकर जिरे (१४), सर्व रा.बुरांडा (ता.मारेगाव), कामिनी धर्माजी जिमने (६३) रा. आबई व ऑटोचालक सुनील बोेंडे रा. शिंदोला हे सात जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदोला येथील ऑटोचालक सुनिल बोंडे याने गुरूवारी दुपारी त्याच्या ऑटो क्रमांक एम.एच. २९ एम- ००१३ मध्ये वणी येथून काही प्रवासी बसविले. ४ वाजताच्या सुमारास हा ऑटो वणी-कोरपना मार्गावरील आबई फाट्यावर पोहोचला. याचवेळी विरूद्ध दिशेने शिंदोलाकडून मोहदाकडे एक भरधाव ट्रक (क्रमांक एच.आर.५८ सी ०४८२) जात होता.या ट्रकने थेट प्रवासी ऑटोला उडविले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.
वणी पंचायत समितीचे माजी सदस्य संजय निखाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर कनाके यांच्यासह अनेकांनी पुढे येऊन जखमींना उपचारासाठी खासगी वाहन व एका रुग्णवाहिकेद्वारे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. यातील काही जखमींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, शिरपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेत मृत पावलेली संजीवनी नागतुरे या महिलेला दोन मुली आहेत. मोठी मुलगी १२ वर्षांची आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ती तिची लहान मुलगी अवनी हिला घेऊन वणीत आली होती, अशी माहिती तिच्या नातलगांनी दिली. येथे कार्यक्रम आटोपल्यानंतर ती गुरूवारी ऑटोने तिच्या गावी कुर्ली येथे जात असताना काळाने या मायलेकींवर झडप घातली.
बॉक्स: आबई फाट्यावर बेशिस्त पार्कींग
वणी-कोरपना मार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशातच आबई फाट्यावर अनेक ट्रक चालक, इतर वाहन चालक अगदी रस्त्याच्या कडेला बेशिस्तीने वाहने उभी करतात, गुरूवारी झालेल्या या भीषण अपघाताला रस्त्यावरील बेशिस्त पार्कींगच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. अपघात घडला त्यावेळी आबई फाट्यावर काही वाहने उभी होती. समोरून भरधाव ट्रक येत असल्याचे दिसताच, ऑटोचालकाने आपला ऑटो थांबविला. त्यानंतर ट्रकने या ऑटोला उडविले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.