राष्ट्रीय महामार्गालगत टाकले ‘स्पेंट वॉश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 05:00 AM2021-06-21T05:00:00+5:302021-06-21T05:00:15+5:30
डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.
ज्ञानेश्वर ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : राष्ट्रीय महामार्गालगत ई-क्लास आणि ‘एनएएच’च्या हद्दीत दिवसाढवळ्या पर्यावरणाला हानिकारक स्पेंट वॉश सांडवा वाहत आहे. एका डिस्टलरी कारखान्याकडून अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा सांडवा वाहत आहे. मात्र, या संदर्भात पर्यावरण विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही.
डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.
सबंधित डिस्टलरी कारखान्यावर पर्यावरण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी जनभावना आहे. पर्यावरणाला घातक असलेले द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉश शासकीय ई-क्लास आणि राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत टँकरच्या साहाय्याने टाकले जाते. गुंज परिसरात असलेल्या कारखान्यात उसापासून तयार होणाऱ्या मोल्यासिसपासून कच्या इथेनॉलची निर्मिती केली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणात अल्कोहोल व सॅनिटायझर तयार केले जाते. हे सर्व ज्वालाग्राही रसायन विविध केमिकल वापरून बनवले जाते. या मोल्यासीसचे रूपांतरण द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉशमध्ये होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.
हा खेळ किती दिवस?
सध्या खरीप हंगाम सुरू असून, लागवडीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात मजूर काम करीत आहेत. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मजुरांना काम करणेही कठीण झाले आहे. डिस्टलरीचा हा अतिरेक आणखी किती दिवस चालेल व किती लोकांचे बळी घेणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात सखोल माहिती घेऊन तक्रार असलेल्या ठिकाणी स्पेंट वॉश टाकणे त्वरित बंद करू. आम्ही मागणीनुसार शेतकऱ्यांना खत म्हणून त्यांची परवानगी घेऊन स्पेंट वॉश टाकत असतो. परंतु महामार्गालगत टाकण्यात आल्याबद्दल माहिती नाही.
- रमेशकुमार शर्मा
जनरल मॅनेजर,
डिस्टलरी प्लांट, गुंज