एक कोटी खर्च, तरीही आजंतीत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:04 PM2017-10-30T22:04:53+5:302017-10-30T22:05:19+5:30
मलकोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि खाकीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आजंती येथे ओंजळभर पाण्यासाठी आजही गावकºयांना संघर्ष करावा लागतो.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : मलकोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि खाकीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आजंती येथे ओंजळभर पाण्यासाठी आजही गावकºयांना संघर्ष करावा लागतो. गत ३० वर्षांपासून पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर तब्बल १ कोटी रुपये खर्च झाले. मात्र गावकºयांची तहान भागली नाही. दोन दिवसापूर्वी तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा आजंतीचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गेलेल्या या तिघांवर काळाने झडप घातली होती.
नेर तालुक्यातील आजंती (खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध. दोन दिवसापूर्वी पाणीटंचाईचा प्रश्न घेऊन महसूल राज्यमंत्र्यांकडे गेलेल्या राहुल काळे, अंकुश जुनघरे, घनश्याम श्रृंगारे या तिघांचा अपघाती मृत्यू झाला. पाणी टंचाईचा प्रश्न सोडवून गावात येताना काळाने झडप घातली. या तिघांच्या बळीनंतर पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला असून गत ३० वर्षांचा लेखाजोगा बघितला तर आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च होऊन पाणीटंचाई संपली नसल्याचे दिसत आहे. १९९५ साली मोझर येथे आजंतीसाठी विहीर खोदण्यात आली. मात्र आजंतीत पाणी पोहोचलेच नाही. जीवन प्राधिकरणाने खोदलेली विहीर कोरडी निघाली. २००४ साली १७ लाख रुपये खर्च करून नेर येथून पाणी व्यवस्थापन केले. परंतु ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने ही योजना अडगळीत पडली. सध्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणीसाठा अडविण्यात आला. २०१५ ला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ३९ लाखांची योजना कार्यान्वित केली. ५० हजार लिटरची टाकी बसविण्यात आली. परंतु ग्रामपंचायतीने ही योजना अद्याप हस्तांतरितच केली नाही. सचिवाला पाणीपुरवठा विभागाने वारंवार पत्र दिले. परंतु विहिरीला पाणी नसल्याचे कारण पुढे करीत हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे गावात बांधलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू झाली आहे. वास्तविक या योजनेत मोठा घोळ असून चुकीची पाईपलाईन टाकण्यात आल्याने ही योजना नावालाच उरली आहे.
३० वर्षापूर्वी या गावातील वसंत भोजाजी राठोड व सुभाष चोपडे यांच्या शेतातील विहिरीत उतरुन गडव्याने बादली भरावी लागत होती. आज ३० वर्षानंतर एक कोटींच्या योजना कुचकामी ठरल्याने तीच वेळ कायम आहे. २०१५ ला गाव टँकरमुक्त घोषित झाले होते. विहिरीत नळ योजनेच्या विहिरीतून पाणी सोडण्यात आले होते. परंतु त्यानंतर ना नळ सुरू झाले ना पाणीटंचाई संपली.
अनेकांनी सोडले गाव
आजंती येथील पाणीटंचाईची दाहकता भयंकर आहे. गावात सोयरीकीसाठी पाहुणे येताना पहिल्यांदा पाणीटंचाईचाच मुद्दा पुढे करतात. अनेक जण तर मुलगी देताना विचार करतात. पाणीटंचाईपुढे हात टेकलेल्या अनेकांनी आता गाव सोडून नेर किंवा इतर ठिकाणी मुक्काम हलविला आहे.
हीच खरी श्रद्धांजली ठरेल
राहूल काळे, अंकुश जुनघरे, घनश्याम श्रृंगारे हे तीन तरुण गावातील पाणी समस्या संपुष्टात आणण्यासाठी अविरत परिश्रम घेत होते. अपघाताच्या दिवशीही या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना भेटले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर या गावाची नळ योजना कार्यान्वित करून प्रशासन त्यांना खरी श्रद्धांजली वाहणार का असा प्रश्न आहे.
आजंती येथील नळ योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे.
- भाग्यलक्ष्मी राठोड
सरपंच, आजंती
पाणीटंचाईने त्रस्त होऊन आजंती येथील नागरिक गाव सोडत आहे. पाणीटंचाई पाचवीला पुजली आहे. माझे जीवाभावाचे सखे ज्यांनी सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावली, त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणावी.
- किशोर अरसोड,
सामाजिक कार्यकर्ते, आजंती