सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:28 PM2024-10-08T17:28:14+5:302024-10-08T17:29:52+5:30

Yavatmal : नैसर्गिक आपत्तीमुळेही बसतोय फटका

Spending thousands on soybeans, no guarantee of income | सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी

Spending thousands on soybeans, no guarantee of income

जब्बार चीनी
लोकमत न्यूज नेटवर्क 
वणी :
शेतकऱ्यांच्या अडचणींचा आलेख दिवसेंदिवस वाढताच चाललेला आहे. यंदाही त्यात आणखी भर पडली. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यात अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीमुळे भरघोस उत्पन्नाची कोणतीही शाश्वती शेतकऱ्यांना राहिली नाही. दरम्यान, उत्पन्नाची शाश्वती नसतानाही शेतकऱ्यांना हजारोंचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. विशेषतः या भागातील सोयाबीनच्या पिकाबाबत हे चित्र दिसत आहे. हजारोंचा खर्च उत्पन्नाची नाही हमी अशी स्थिती बनली आहे.


यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी जवळपास एकरी २५ हजार खर्च करावा लागला. एवढा खर्च करूनही म्हणावे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. उत्पादनात घट त्यात बाजारातही शेतीमालाला कवडीमोल किंमत त्यामुळे उत्पादन खर्च हा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या अंगलट असणार आहे हे नक्की. शेतकऱ्यांनी नुकसानीची शेती करून रोजचा खर्च, बँकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी खर्च कुठून करायचा, असा मोठा प्रश्न आहे. परिणामी दुसरीकडे राज्यकर्ते त्यांचे सोयीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. मतांसाठी घोषणांचा पाऊस पडत आहे. 


मात्र, सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या योजनांच्या पावसाचा थेंबही अजून पोहोचला नाही. दरम्यान, दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर विमा आणि अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. एकीकडे सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे, तर दुसरीकडे तेच सोयाबीन काढणीसाठीचा दर हमीभावापेक्षा जास्त आहे. सोयाबीनचा यंदाचा हमीभाव चार हजार ८९२ रूपये आहे. मात्र बाजारात चार हजार २०० ते चार हजार ६०० दर मिळत आहे. दुसरीकडे सोयाबीन काढणीचा दरएकरी साडेपाच ते ६ हजार इतका आहे. म्हणजे काढणीचा दर सोयाबीनच्या बाजारभावापेक्षाही जास्त आहे. शिवाय शेतात काम करणाऱ्या मजुराला ५०० ते एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते. तोच शेतकऱ्यांना मात्र चार महिन्यांमधील पिकाचा हिशोब केल्यास प्रतिदिन ५४ ते १२५ रुपये पडतात, जे मजुरांच्या मजुरीहूनही कमी आहेत. 


अशी आहे आकडेमोड
सोयाबीन पिकाचा कालावधी ४ महिने, एकरी उत्पादनाचा अंदाज ५ ते ८ क्विंटल, बाजार भावाप्रमाणे उत्पन्न ३० ते ४० हजार, झालेला खर्च २३ हजार ५०० रुपये, शेतकऱ्यांना निव्वळ उत्पन्न सहा हजार ते १५ हजार रुपये.


एकरी उत्पादन खर्च 
पेरणीपूर्व मशागत - ३०००
पेरणी - ८००
बियाणे - ३०००
खत - १५००
फवारणी ५५०० 
काढणी ५५०० 
हमाली - वाहनभाडे  - १०००
एकूण खर्च - २३,५००

Web Title: Spending thousands on soybeans, no guarantee of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.