अधर पूस प्रकल्पाची वाताहत
By Admin | Published: December 24, 2015 03:06 AM2015-12-24T03:06:51+5:302015-12-24T03:06:51+5:30
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे.
सिंचनाची बोंबाबोंब : २० कोटींचा प्रस्ताव आला पाच कोटींवर
संजय भगत महागाव
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे. सिंचनाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नाही. २० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव वारंवार त्रुट्या काढून पाच कोटींवर आणला गेला. यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रकल्पावरील वसुलीचे कारण पुढे करण्यात येते.
अधर पूस प्रकल्प अर्थात वेणी धरणाची सिंचन क्षमता नऊ हजार १०८ हेक्टर आहे. या प्रकल्पाची निर्मिती १९८० मध्ये करण्यात आली. गत ३५ वर्षात शेवटपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. पाणी वाटप आणि त्यावरील वसुली नियमित खतवल्या जाते. या कागदोपत्री खतवणीच्या वसुलीपोटी सात कोटी रुपये थकीत आहे. ही थकीत रक्कम वारंवार पुढे करून अधर पूस प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गुंडाळून ठेवला जातो. प्रकल्पाच्या गरजेनुसार टेलपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती, पाटसऱ्या आदी दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून २० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. परंतु या आराखड्यात वारंवार त्रुटी काढल्या जात आहे. त्यामुळे ३३ गावांचे ओलित रखडले आहे. या ३३ गावातून २३०० शेतकरी लाभार्थी असून नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. प्रकल्पाची आर्थिक नाकेबंदी करून वाहाहत सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचा प्रचंड अनुशेष वाढला आहे. पाच वर्षापूर्वी २५ कर्मचारी प्रकल्पावर राबत होते. त्यामुळे पाण्याची मागणी होत असे. वसुलीही होत होती. पाण्याचा अपव्यय कमी होत होता. सध्या येथे पाचच कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यात अडचण येत आहे. नादुरुस्त कालवे, लघु वितरिका, उपवितरिका तुडूंब भरून वाहत असून लघु वितरिकांमध्ये वाढलेली झुडुपी वनस्पती पाणी वाहून नेण्यास अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून प्रकल्पाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पुढे आला. त्याबाबत यवतमाळच्या पाटबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत निधी कपातीचा प्रस्ताव पुढे आला. २० कोटींचा हा प्रस्ताव केवळ पाच कोटींवर आला. त्यात दुरुस्ती होणार कशी, असा प्रश्न आहे.
सिंचन होणार तरी कसे ?
अधर पूस प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र ९ हजार १०८ हेक्टर आहे. त्यापैकी पाच हजार हेक्टर खरीप, दोन हजार ७७२ हेक्टर रबी आणि ५२८ हेक्टर उन्हाळी ओलित क्षमता आहे. मात्र अद्यापपर्यंत या क्षमतेने सिंचन झाले नाही. पाण्याचा अपव्यय होत असून पाणी वापर संस्थाही उदासीन दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरला आहे.