दिग्रसच्या निबंध स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:38+5:302021-04-29T04:32:38+5:30
दिग्रस : येथील बा. बू. कला, ना. भ. वाणिज्य आणि बा. पा. विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे ...
दिग्रस : येथील बा. बू. कला, ना. भ. वाणिज्य आणि बा. पा. विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यभरातून तब्बल १३३ विद्यार्थ्यांनी यात ऑनलाइन सहभाग नोंदविला.
‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष’, ‘आजादी का अमृत महोत्सव’, हा उपक्रम साजरा करण्याबाबत केंद्र व राज्य शासन व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आणि भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित विविध विषयांवर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा होती. यात सहभाग नोंदविण्यासाठी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य विनोद खळतकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रवीण चांडक, प्रा. प्रिया भट, प्रा. मनोज भगत व सर्व प्राध्यापकांनी संपर्क साधून व ऑनलाईन माहिती पाठवून आवाहन केले. त्यानुसार राज्यभरातील १३३ निबंध ऑनलाईन प्राप्त झाले. परीक्षण माजी इतिहास प्रमुख प्रा. सुधीर पाठक यांनी केले.
बॉक्स
निकालात मुलींनी मारली बाजी
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा रोख ३००१ रुपये पुरस्कार किसनवीर महाविद्यालय वाई जि. सातारा येथील हीना सादिक बागवान हिने पटकाविला. द्वितीय क्रमांकाचे रोख २००१ रुपये बक्षीस से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय कारंजा (लाड) जि. वाशिम येथील मेघा मोतीराम शिंदे, तर तृतीय क्रमांकाचे रोख १००१ रुपयांचे बक्षीस येथील बा. बू. कला, ना. भ. वाणिज्य आणि बा. पा. विज्ञान महाविद्यालयाची श्रेया गजानन गावंडे हिने पटकाविले. प्रोत्साहनपर ५०१ रुपयांचे बक्षीस पायल अजय अग्रवाल, चैताली दीपक रेचे यांनी पटकाविले.