क्रीडाप्रेमी ठाणेदार वर्दीवरच उतरले कबड्डीच्या मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:09 PM2021-01-28T12:09:44+5:302021-01-28T12:14:26+5:30
यवतमाळ : कबड्डीसारख्या रांगड्या खेळाचे आकर्षण सर्वांनाच असते. अलिकडे हा खेळ दुर्लक्षीत होत असला तरी ग्रामीण भागात मात्र कबड्डीच्या ...
यवतमाळ: कबड्डीसारख्या रांगड्या खेळाचे आकर्षण सर्वांनाच असते. अलिकडे हा खेळ दुर्लक्षीत होत असला तरी ग्रामीण भागात मात्र कबड्डीच्या स्पर्धा अद्यापही भरविल्या जातात. यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या झरी येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी चक्क खाकी वर्दीत कबड्डीच्या मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करत अवघ्या क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधले. निमीत्त होते झरी येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाचे.
झरी येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांना उद्घाटक म्हणून पाचारण करण्यात आले होते. कबड्डीचे सामने सुरू होताच, मुळातच क्रीडाप्रेमी असलेले धर्मा सोनुने यांना कबड्डी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. ते लगेच खाकी वर्दीवरच कबड्डीच्या मैदानात उतरले. त्यांच्या दमदार एंट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांनी एंट्री केली खरी, मात्र प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना लगेच बाद केले. त्यांच्या या खेळाडू वृत्तीचे उपस्थित क्रीडाप्रेमींनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
पोलिसांबद्दल सामान्यांच्या मनात कायम दरारा असतो. पण एखादा अधिकारी आपल्या अधिकारीपदाचा अभिनिवेश बाजुला सारून सामान्यांच्या समूहात सामिल होतो. यातूनच सामान्य माणूस आणि अधिकारी यांच्यात सुसंवादाचा सेतू बांधल्या जातो. गुरूवारी कबड्डी सामन्यात झालेल्या या अनोख्या प्रकाराने नेमका हाच संदेश समाजवर्तुळात पेरल्या गेला.