वसंतच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्याचा नातूही रिंगणात
By admin | Published: March 26, 2016 02:22 AM2016-03-26T02:22:50+5:302016-03-26T02:22:50+5:30
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा नातू ...
२४६ अर्ज : विद्यमान आमदारासह चार माजी आमदारांचे नामांकन
अविनाश खंदारे उमरखेड
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा नातू राज जय नाईक यानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. तर एका विद्यमान आमदारासह चार माजी आमदार रिंंगणात असून २४६ उमेदवारांनी निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाने निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय समीकरणे बदलत आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. २३ मार्च या नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २४६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आजी-माजी आमदार निवडणूक रिंगणात उतरले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे सुपूत्र जय नाईक यांचे चिरंजीव राज नाईक यांनीही या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. त्यांनी आपला अर्ज पुसद गट व विमुक्त भटक्या जाती जमाती मतदारसंघातून दाखल केला आहे. अॅड.निलय नाईक यांनी वसंतचे उपाध्यक्षपद भूषविले होते. परंतु त्यानंतर नाईक घराण्याचा कुणीही वसंत साखर कारखान्यावर संचालक किंवा पदाधिकारी म्हणून आला नाही.
कारखाना डबघाईस आला असताना या निवडणुकीत रंगत राहणार नाही, असा अंदाज होता. परंतु २३ मार्च रोजी राज नाईक यांनी आपले नामांकन दाखल केले आणि सर्व राजकीय समीकरणेच बदलली आहे. नाईक घराण्याचे वारसदार पुन्हा या कारखान्यात येण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी आपली मते व त्यांना मानणारा गट कोणाला घेवून बसणार हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
या निवडणुकीत ऊस उत्पादक गट पुसदमध्ये २८, उमरखेड ३५, ढाणकी ३१, महागाव २३, हदगाव ४७, सहकारी संस्था मतदारसंघात १५, अनुसूचित जमाती सात, महिला राखीव २९, इतर मागास प्रवर्ग १७, भटक्या विमुक्त जाती १४ असे २४६ जणांनी नामांकन दाखल केले आहे. १२ एप्रिलपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत असून त्यानंतरच या निवडणुकीचे स्पष्ट होईल.
अनेक दिग्गज आमने-सामने
या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केले असून हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर, प्रकाश पाटील देवसरकर, माधवराव पाटील यांच्यासह जेठमलजी माहेश्वरी यांचे नातू नितीन माहेश्वरी, अजय माहेश्वरी, अनिल कदम यांनी नामांकन दाखल केले आहे. तसेच बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, युवराज देवसरकर, विजय जैन, अॅड.माधवराव माने, चितांगराव कदम, शामराव सुरोशे, शंकरराव तालनकर, स्मिता कदम यांनी उमेदवारी दाखल केली आहे.