SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:45 PM2019-06-08T15:45:15+5:302019-06-08T15:45:53+5:30
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. त्यासाठी विविध कारणे सांगितली जात असली तरी शिक्षण विभागाने या वर्षापासून बंद झालेले प्रात्यक्षिकाचे गुण हे प्रमुख कारण पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.९९ टक्के एवढा लागला होता. परंतु शनिवारी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी अवघी ६६.३३ एवढी नोंदविली गेली. वर्षभरात दहावीचा निकाल सुमारे १८ टक्क्यांनी घटला. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा सर्वात शेवटी अर्थात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. या घटलेल्या टक्केवारीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. ३४ टक्के विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपर्यंत सर्वच विषयात प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात होते. परंतु यावर्षापासून हे गुण केवळ गणित व विज्ञान या विषयांपुरते मर्यादित करण्यात आले. त्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. याशिवाय आठवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय, कॉपीमुक्ती अभियान, दहावीत विद्यार्थ्यांना लागणारे उच्चशिक्षणाचे वेध, दहावीतच या उच्च शिक्षणाची सुरू झालेली तयारी, त्यामुळे दहावीच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, मोबाईलचा वापर याबाबीही कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात सातत्याने बदल्यांच्या राजकारणात व्यस्त राहणाऱ्या शिक्षक मंडळींकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप पालकवगार्तून केला जात आहे. नापास विद्यार्थ्यांमध्ये अनेक महागड्या व नामांकित कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचीही माहिती आहे.
मोटिव्हेशनमध्ये शिक्षक कमी पडले
जिल्ह्याच्या १८ टक्क्यांनी घटलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचे मोटिव्हेशन करण्यात कमी पडले, त्यांनी विद्यार्थ्यांवर त्याच्या यशासाठी पुरेसे परिश्रम घेतले नाही. गेल्या वर्षीची प्रॅक्टीकलच्या २० मार्कांची सवलत बंद झाली. मात्र शिक्षक वर्ग या सवलतीच्या भ्रमात राहिला. त्यातून शिक्षकांनी बाहेर निघून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रेरणादायी शिक्षण देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष झाले आणि बोर्डाने या शिक्षकांना झटका दिला, अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्याने नोंदविली. या घटलेल्या निकालासाठी बहुतांश शिक्षकांचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.