एसटी बस वाहकच निघाला दारू तस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:19 PM2018-10-26T22:19:19+5:302018-10-26T22:19:46+5:30
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली. परिवहन विभागातील सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याने गोपनीय माहितीवरून शुक्रवारी दुपारी येथील पांढरकवडा बायपासवर ही कारवाई केली.
अमरावती-चंद्रपूर ही बस यवतमाळ बसस्थानकावर आली. यवतमाळातून चंद्रपूरला दारू जात असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा व दक्षता अधिकाºयाला मिळाली. चंद्रपूर बस शहराबाहेर निघताच दबा धरून असलेल्या सुरक्षा अधिकारी जयंत कांडलकर यांनी पाढंरकवडा बायपासवर बस थांबविली. सुरक्षा पथकाने फक्त वाहक गणेश शंकरराव बन्सोड (बिल्ला क्रं. ३४४०) याच्या पेटीची झडती घेतली. त्याच्या पेटीमध्ये विदेशी मद्याच्या चार बॉटल्स आढळून आल्या. हा वाहक अनेक दिवसांपासून प्रत्येक फेरीत चंद्रपूरला दारू पोहोचविण्याचे काम करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी वाहकाविरूद्ध दारूबंदी कायदानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच चालक विजय धुमाळ यांचा जबाब घेतला. ही कारवाई सुरक्षा व दक्षता पथकातील निरीक्षक दिलीप लोखंडे, सहायक निरीक्षक गणेश केरबा कदम, राजेश गणपत बन्सोड यांनी केली. या कारवाईमुळे एसटी कर्मचारी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.