एसटीने ज्येष्ठ वारकऱ्यांना धरले वेठीस; पात्र असूनही पूर्ण तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 11:13 AM2022-07-12T11:13:54+5:302022-07-12T11:16:00+5:30
पंढरपूरला वारीसाठी गेलेल्या एका वारकऱ्याचे वय ६६ वर्षे पूर्ण झालेले असताना त्याला सवलतीचा प्रवास नाकारण्यात आला. तिकिटाची पूर्ण रक्कम त्याच्याकडून घेण्यात आली.
यवतमाळ :पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे मुख्यमंत्र्यांकडून जाहीरपणे सांगितले जात आहे. मात्र, शासनाचाच उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाकडूनच ज्येष्ठ वारकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. नियमात बसत असतानाही त्यांना सवलत प्रवास नाकारून तिकिटाची पूर्ण रक्कम वसूल केली जात आहे.
६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही, त्यांना प्रचलित पद्धतीने अर्थात आधार कार्डच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ दिला जातो. आधार कार्डवरील जन्म तारखेविषयी संशय असल्यास स्कॅनिंग मशीनद्वारे खात्री केली जाते. यामध्ये काही दोष आढळल्यास प्रवास सवलत नाकारण्यात येते; परंतु वारकऱ्यांना वेगळाच अनुभव येत आहे.
पंढरपूरला वारीसाठी गेलेल्या एका वारकऱ्याचे वय ६६ वर्षे पूर्ण झालेले असताना त्याला सवलतीचा प्रवास नाकारण्यात आला. तिकिटाची पूर्ण रक्कम त्याच्याकडून घेण्यात आली. यात्रा काळात केवळ आठ ते नऊ दिवसांत ७०० ते ८०० केसेस सुरक्षा व दक्षता विभागाकडून केल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो; परंतु यातील सत्यता तपासण्याचीही आवश्यकता आहे. काही प्रकरणात जाणीवपूर्वक कारवाई झाल्याचे सांगितले जाते.
वर्षभरात नाही, आठ दिवसांतच का?
केवळ आठ दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा केसेस केल्या जातात. वर्षभरात का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुरक्षा व दक्षता विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेदरम्यान सवलत प्रवास नाकारल्या गेलेल्या सर्व केसेसची सखोल चौकशी झाल्यास सत्य बाहेर येण्यास वेळ लागणार नाही, असे बोलले जाते. वर्षभरात अशा प्रकारची झालेली कारवाईसुद्धा यानिमित्ताने पुढे येऊन दक्षता व सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेचा हिशेबही निघेल, असे सांगितले जाते.
माहिती घेऊन सांगतो
ज्येष्ठ वारकऱ्याला प्रवास सवलत नाकारून दंड करण्यात आल्याच्या प्रकाराविषयी एसटी महामंडळाचे उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा यात्रा व्यवस्था प्रमुख यांना विचारले असता त्यांनी माहिती घेऊन कळवितो, असे सांगितले; परंतु त्यांच्याकडून यासंदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. आता वरिष्ठ स्तरावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.