‘एसटी’ चालतेय प्रभारीच्या चाकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:59 PM2018-06-20T23:59:05+5:302018-06-20T23:59:05+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.
मागील काही महिन्यांपासून विभाग नियंत्रक प्रभारी आहे. विभागीय वाहतूक अधिकारी, वणी येथे नियमित आगार व्यवस्थापक नाही, यवतमाळ बसस्थानकाला प्रमुखही प्रभारीच आहे. वाहतूक निरीक्षकही कायम स्वरूपी नाही. याशिवाय मुख्य कारागिरांची वाणवा आहे. शिकाऊ उमेदवारांकडून कार्यशाळेचा कारभार ढकलला जात आहे.
नियमित अधिकारी नसल्याने कामांमध्ये सातत्य नसल्याचे दिसून येते. केवळ दिवस ढकलण्याचे काम सुरू आहे. जबाबदारीने काम सांभाळले जात नाही. परिणामी बसफेºया रद्द होणे, बसेसची वेळेत दुरुस्ती न होणे या व इतर प्रकारच्या कामांवर परिणाम होत आहे. भाडेवाढीच्या दिवशी तर अनेक मार्गावरील बसफेºया रद्द झाल्या होत्या. काही ठिकाणच्या फेºया उशिराने गेल्या. यात महामंडळाचे नुकसान झाले. बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याची या विभागात नेहमीची ओरड आहे. पंढरपूर यात्रा जवळ आली आहे. यासाठी ७० ते ८० बसेस सोडल्या जाणार आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर बसचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे आगारात दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या बसेसची कामे तातडीने होण्याची गरज आहे. यासाठी अधिकाºयांना खंबीर भूमिका घ्यावी लागणार आहे.
मार्ग बदलविला, मात्र भाडे कायम
यवतमाळ बसस्थानक ते वडगावपर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने या भागातून जाणाºया बसेसचा मार्ग बदलविण्यात आला आहे. लोहारा, भोयर, वाघाडी असा जवळपास सात ते नऊ किलोमीटरचा फेरा घेऊन बस आर्णी मार्गावर जात आहे. एक टप्प्यापेक्षा अधिक प्रवास या मार्गाने जाणाºया बसेसचा वाढला आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन भाडेवाढ अपेक्षित होती. हा निर्णय न झाल्याने महामंडळाचे दररोज किमान तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान होत आहे. शारदा चौक ते भोसा मार्गाचे काम सुरू असताना पांढरकवडा बायपासवरून वाहतूक वळविण्यात आली होती. त्यावेळी महामंडळाने घाटंजी मार्गावरील बसचे भाडे वाढविले होते.