एसटी महामंडळ तपासणार वाहकांचे खिसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 07:47 AM2024-02-08T07:47:41+5:302024-02-08T07:48:35+5:30
राज्यात तीन दिवस राबविणार मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळण्यास तिकीट चोरी हेही एक प्रमुख कारण सांगितले जाते. अनेकांवर
कारवाई होऊनही तिकीट चोरी नियंत्रणात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर काही वाहकांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधत अपहार केला जात आहे.
असाच एक गंभीर प्रकार आढळल्याने महामंडळ सतर्क झाले आहे. वाहकांची तीन दिवस तपासणी केली जाणार आहे. याअंतर्गत त्यांचे मॅन्युअल ट्रे, तिकीट पेटी, बॅग आणि खिसेही तपासले जाणार आहेत.
सुरक्षा विभाग कशासाठी?
nतांत्रिक बाबींची तपासणी वेळोवेळी करण्याची जबाबदारी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागावर आहे.
nनवनवीन प्रयोग करून वाहकांकडून अपहार होत असताना हा विभाग नेमका कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोबाइलमधील ॲप तपासणार
तीन दिवस राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत वाहकांचे मोबाइलही तपासले जाणार आहेत. त्यामध्ये कोणते ॲप आहे, याची पाहणी केली जाणार आहे.
प्रवाशाला दिलेले तिकीट योग्य दराचे, योग्य सवलतीचे आहे की नाही, याची खात्री करून घेतली जाणार आहे. ईटीआय मशीन व्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्यास त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
३५ हजारांवर वाहकांची होणार तपासणी
nमहामंडळाच्या सांगली विभागात येणाऱ्या इस्लामपूर आगारातील एका वाहकाने अपहारासाठी नवीन फंडा वापरला. मोबाइल प्रिंटर व त्यात एसटीचा तिकीट रोल टाकून प्रवाशाला बनावट तिकीट दिले. तिकिटाची संपूर्ण रक्कम या वाहकाने हडप केली.
nमहामंडळाच्या ३५ हजारांवर वाहकांची ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत तपासणी केली जाणार आहे.