एसटी चालक-वाहकांना ‘काम नाही तरी मिळणार दाम’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:43 AM2021-03-13T01:43:42+5:302021-03-13T01:44:06+5:30
नियमित कामगारांच्या सुट्यांवरील संकट टळले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे ‘काम नाही, तर दाम नाही’ धोरण राबवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) काही विभागांतील नियमित चालक-वाहकांसाठी यात थोडी ढील देण्याचा निर्णय घेतला आहे. काम मिळाले नाही, तरी त्यांना पगार दिला जाणार आहे. यायोगे त्यांच्या सुट्यांवरील संकट टळले आहे.
कोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो. प्रवासी फिरकत नसल्याने एसटीच्या अनेक बसफेऱ्या रद्द होत आहेत. बसफेऱ्या रद्द झाल्याने बहुतांश नियमित चालक-वाहकांना काम मिळत नाही. परिणामी, त्यांना सुटी टाकून घरी जावे लागते. नियमित कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० दिवसांच्या पगारी सुट्या आहेत. कामावर येऊनही कामगिरी न मिळाल्यास या ४० दिवसांच्या सुट्या संपल्यास पुढील सुट्या बिनपगारी होतात. यात या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी कामगिरी मिळाली नसली तरी, त्यांना पगार दिला जाणार आहे.
महामंडळाच्या अमरावती प्रदेशातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर प्रदेशातील वर्धा विभागात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवाशांची वर्दळ अत्यल्प आहे. शिवाय चंद्रपूर, गडचिरोली या विभागातही गरजेनुसार बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले. यामुळे चालक आणि वाहकांना कामगिरीवर उपस्थित राहूनही काम मिळाले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना विनाकामगिरी राहावे लागले.
प्रशासनाने स्वत:हून वाहतूक बंद ठेवल्यास उपस्थित असूनही कामगिरी न मिळालेल्या चालक-वाहकांना हजेरी देण्याची तरतूद कामगार करारात आहे. त्याचे पालन काही ठिकाणी होत नाही. अमरावती आणि नागपूर प्रदेशातील नियमित चालक-वाहकांना हजेरी मिळणार आहे.
- राहुल धार्मिक, यवतमाळ विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना.