ST Employees: 500 रुपयात दोन ड्रेस कसे शिवणार? हा शिलाई भत्ता की एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:05 AM2023-04-19T08:05:07+5:302023-04-19T08:08:32+5:30
ST Employees: पाच वर्षांपूर्वी शिवून मिळालेल्या गणवेशाविषयी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड ओरड झाल्यानंतर आता गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे.
यवतमाळ : पाच वर्षांपूर्वी शिवून मिळालेल्या गणवेशाविषयी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड ओरड झाल्यानंतर आता गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. बाजारात दोन गणवेशाच्या शिलाईसाठी कमीत कमी १२०० ते १६०० रुपये खर्च येतो. मात्र महामंडळाने केवळ २५० रुपये प्रतिगणवेष म्हणजे ५०० रुपये शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘भत्ता देता की थट्टा करता’ असा संताप कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पूर्वी कर्मचाऱ्यांना कापड आणि शिलाई भत्ताच दिला जात होता. मात्र, २०१७ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्षांनी गणवेश बदलण्याची योजना आखून दोन तयार गणवेश दिले होते. या गणवेशाबाबत प्रचंड तक्रारी आल्याने महामंडळाने कापड, शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला.
६५ हजार कर्मचारी, १५ कोटी खर्च
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात ६५ हजार कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड आणि शिलाई भत्ता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एकूण खर्च १५ कोटी रुपये आहे.
खर्च १६००, मिळणार ५००
एसटी कर्मचाऱ्यांच्या मते एका दोन ड्रेससाठी कमीत कमी १६०० रुपये शिलाई खर्च येतो. मात्र भत्ता ५०० रुपये मिळणार असल्याने एकाला ११०० रुपये खिशातून भरावे लागणार आहे. ६५ हजार कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास ७ कोटींहून अधिक रुपये शिलाईपोटी खिशातून भरावे लागणार आहेत.