एसटी कर्मचारी पगारासाठी ठोठावणार लोकप्रतिनिधींचे दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:06+5:30
कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना निर्धारित तारखेला वेतन दिले जात नाही. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकीत वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी यासाठी कामगार संघटनेतर्फे सर्व पातळींवर निवेदन देणार आहेत. २ नोव्हेंबरला निवेदन दिल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ९ नोव्हेंबर रोजी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर सहकुटुंब आक्रोश करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाने पगाराचे वांदे करून ठेवल्याने एसटी कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. मागील आठ महिन्यांपासून त्यांना अनियमित वेतनाला सामोरे जावे लागत आहे. अखेर त्यांनी पगार आणि इतर आर्थिक प्रश्न निकाली निघावे यासाठी लोकप्रतिनिधींचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. २ नोव्हेंबर रोजी कामगार संघटनेच्या नेतृत्त्वात हे कर्मचारी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.
कोरोना विषाणूच्या महामारीतही जीवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करत असतानाही या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिला जात नाही. अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. ७३ जणांचा मृत्यू झाला. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या बहुतांश कुटुंबाला विमा कवचाची ५० लाखांची मदत प्रशासनाने दिलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानाही ऑगस्टपासूनचे वेतन दिले नाही. सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कापले. या सर्व बाबीमुळे कर्मचारीवर्ग हतबल झाला आहे.
ऑक्टोबरच्या वेतनाची तारीख जवळ येवूनही ऑगस्ट, सप्टेंबरचे पगार झालेले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव पाच टक्के महागाई भत्ताही लागू करण्यात आलेला नाही. महागाई भत्त्याची सन २०१८ मधील दोन टक्के तीन महिन्यांची थकबाकी तसेच २०१९ मधील तीन टक्क्याची नऊ महिन्यांची थकबाकी महामंडळाने या कर्मचाऱ्यांना दिली नाही.
कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना निर्धारित तारखेला वेतन दिले जात नाही. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकीत वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी यासाठी कामगार संघटनेतर्फे सर्व पातळींवर निवेदन देणार आहेत. २ नोव्हेंबरला निवेदन दिल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ९ नोव्हेंबर रोजी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर सहकुटुंब आक्रोश करणार आहेत. या सर्व बाबी एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
शासनाने महामंडळाला निधी द्यावा
कोरोना या वैश्विक महामारीमध्ये एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता प्रवाशांना सेवा देत आहेत. अशा कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांची ही दिवाळी अंधारात जावू नये. याकरिता शासनाने एसटी महामंडळाला निधी देवून कामगारांचे आर्थिक प्रश्न निकाली काढावे, असे कामगार संघटनेचे केंद्रीय प्रसिद्धी व औद्योगिक संबंध सचिव सदाशिव शिवनकर यांनी म्हटले आहे.