एसटीची आस्थापना शाखा बेताल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:40 PM2019-06-30T21:40:22+5:302019-06-30T21:40:50+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील आस्थापना शाखा बेताल झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान या शाखेत केले जात आहे. याशिवाय रजेवर नसलेल्या लोकांच्या रजा मंजूर करण्याची किमयाही या शाखेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील आस्थापना शाखा बेताल झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान या शाखेत केले जात आहे. याशिवाय रजेवर नसलेल्या लोकांच्या रजा मंजूर करण्याची किमयाही या शाखेने केली आहे. या शाखेला ताळ्यावर आणण्याची मोठी जबाबदारी विभाग नियंत्रकांवर येऊन पडली आहे. यात ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आस्थापना शाखेतील लिपिक ते कर्मचारीवर्ग अधिकारी यांना कामाविषयी कुठलीही आस्था दिसत नाही. दिवस ढकलण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते. आगार व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाºयांना सुटीवर नसतानाही रजा मंजूर केल्या जातात. एक अधिकारी रजेवर नव्हते. त्यांच्या रजेचे दिवस तारखेनुसार दोन दाखविले. एवढेच नव्हे तर त्यांची तीन दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. दुसºया एका आगार पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयाच्या बाबतीतही असाच प्रकार करण्यात आला. रजा कालावधी दोन दिवसांचा दाखविला, तर मंजूर रजा चार दिवस आहे.
वैद्यकीय पगारी रजा या अधिकाºयांना मंजूर केल्या गेल्या. संबंधित अधिकारी रजेवर नसतानाही त्यांना आजारी पाडण्याचा प्रताप या शाखेतून झाला आहे. एवढेच नव्हे तर काही कामगारांच्या इन्क्रीमेंट वाढविण्यातही या शाखेने आखडता हात घेतला. यात सदर कामगार अधिक आर्थिक लाभाला मुकले आहेत. वर्षभरानंतर इन्क्रीमेंट वाढविण्याची जबाबदारी आस्थापना शाखेची आहे. मात्र संबंधित कर्मचाºयांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या कर्मचाºयांना वाढीव उपदान, वेतनवाढ, घरभाडे भत्त्याला मुकावे लागत आहे.
आर्थिक बाबीविषयी लिपिकाने टाकलेली टिप्पणी या विभागातील इतर अधिकाºयांच्या हाताखालून जाते. यातील कुणालाही टिप्पणीतील त्रूट्या लक्षात येऊ नये याविषयी साधार शंका व्यक्त केली जात आहे. कामगारांचे नुकसान होत असताना अधिकाऱ्यांकडूनही संबंधितांवर कारवाई करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. यामुळे आस्थापना विभागातील कारभार दिवसेंदिवस आणखी बिघडत चालला आहे.
पर्यायी जागेचे भिजत घोंगडे
यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे रूप पालटणार आहे. यासाठी ही जागा मोकळी करून पाहिजे आहे. परंतु एसटीला अजूनतरी पर्यायी जागा सापडली नाही. यवतमाळ नगरपरिषदेची मनधरणी केली जात आहे. परंतु यात एसटीला यश आले नाही. एसटीचे विभागीय कार्यालय असलेली रिकामी जागा आणि आर्णी रोडवरील नगरपरिषदेचा गोठा या दोन जागा सर्वदृष्टीने सोयिस्कर मानल्या जातात. परंतु अजूनतरी त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.