‘एसटी’ने सव्वाशे कोटी दिले, आता बांधा घर, घ्या गाडी

By विलास गावंडे | Published: May 7, 2024 11:45 PM2024-05-07T23:45:57+5:302024-05-07T23:46:06+5:30

मागणी करा मिळेल पैसा : संगणक खरेदीसाठीही यंदा मिळणार ॲडव्हॉन्स

'ST' paid 500 crores, now build a house, buy a car | ‘एसटी’ने सव्वाशे कोटी दिले, आता बांधा घर, घ्या गाडी

‘एसटी’ने सव्वाशे कोटी दिले, आता बांधा घर, घ्या गाडी

यवतमाळ : स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे स्वप्नाला आकार मिळत नाही. अशावेळी कुठे आधार मिळाला तर, मात्र स्वप्न पूर्ण होण्यास वेळही लागत नाही. एसटी महामंडळाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी आता सहकार्याचा गिअर टाकला आहे. शिवाय, दुचाकी आणि संगणक खरेदीसाठी पैसा उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. याकरिता ११८ कोटी ३१ लाख ६२ हजार रुपये २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

दरमहा मिळत असलेल्या वेतनातून मूलभूत गरजा भागविणेही कठीण जाते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे औषधपाणी, पाल्यांचे शिक्षण यावरच हाती आलेला पैसा खर्ची पडतो. शिवाय, कार्यप्रसंगाच्या खर्चाची त्यात भर पडते. हाती यामुळे हाती शिल्लक काहीच राहात नाही. उलट काही कर्मचाऱ्यांना कर्जाऊ रक्कम घ्यावी लागते. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी घर बांधकामाचा विचार दिवास्वप्नच ठरते. दुचाकीही आज गरजेची आहे. पाल्यांना शिक्षणाकरिता संगणक आवश्यक आहे. या गरजा पूर्ण करायचा कशा, याची विवंचना एसटी कर्मचाऱ्यांना नेहमीच सतावते.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या विवंचनेतून कर्मचारी बाहेर निघावा यासाठी यंदा सहकार्याची भूमिका घेतली आहे. विविध कामांसाठी स्वतंत्र असा निधी मंजूर केला आहे. घर बांधकामासाठी ११४ कोटी ४० लाख ९९ हजार रुपये मंजूर केले आहेत. दुचाकी खरेदीसाठी तीन कोटी ८६ लाख ४५ हजार रुपयांची तरतूद केली आहे, तर संगणक खरेदीसाठी ४१ लाख आठ हजार रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

राज्यातील ३१ पैकी २७ विभागासह महामंडळाच्या इतर चार घटकांनी अग्रीम मागणीही नोंदविलेली आहे. याचा विचार करून रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आवश्यक ती प्रक्रिया पार पाडल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना मागणीनुसार रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. संगणक अग्रीम केवळ अधिकाऱ्यांनाच दिला जाणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
 

घरासाठी सर्वाधिक रक्कम मंजूर झालेले दहा विभाग
विभाग मंजूर रक्कम

पुणे २२, ४९, ३९, ०००,
मुंबई १०, ५०, ००, ०००,

बुलढाणा १६, ५६, ५०, ०००,
लातूर १४, ५४, ००, ०००,

यवतमाळ ८, ५४, ४०, ०००,
अमरावती ७, ७४, ३०, ०००,

वर्धा ३, ३३, ४०, ०००,
सातारा २, ००, ००, ०००,

ठाणे १, ८०, ००, ०००,
रायगड १, २७, ००, ०००

Web Title: 'ST' paid 500 crores, now build a house, buy a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.