तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीचा दुखवटा संपला, ६५० कर्मचारी कामावर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 05:13 PM2022-04-16T17:13:33+5:302022-04-16T17:29:22+5:30
न्यायालयाच्या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संपातून माघार घेतली. शनिवारी हा दुखवटा संपविण्यात आला.
यवतमाळ : एसटीच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांपासून बेमुदत संप सुरू केला होता. या प्रकरणात न्यायालयाने २२ मेपर्यंत पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संपातून माघार घेतली. शनिवारी हा दुखवटा संपविण्यात आला.
यामुळे राज्य परिवहन महामंडळापुढे विविध अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. पुढील आठवडाभरात सर्व कर्मचारी कामावर रुजू होतील, अशी शक्यता आहे. ८ ते १५ एप्रिलपर्यंत ३०३ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यामुळे कामावर रुजू होणाऱ्या चालक-वाहकांची संख्या ६५० च्या घरात पोहोचली आहे. उर्वरित चालक-वाहक लवकरच कामावर रुजू होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून फेऱ्या वाढतील.
२२ एप्रिलची डेडलाईन
न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यासाठी अवधी दिल्याने कर्मचारी परतण्यास सुरुवात झाली हाेती. यवतमाळातील आंदोलन सोमवारी संपेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, हे आंदोलन शनिवारीच मागे घेण्यात आले.
एसटीच्या फेऱ्या वाढणार
मर्यादित कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे एसटीने लांबपल्ल्याच्या गाड्यांकडे लक्ष वळविले होते. आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक मार्गावर एसटीच्या फेऱ्या दिसण्यास सुरुवात होईल. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना याची मोठी मदत होणार आहे.
दरदिवसाला २५ लाखांचे उत्पन्न
तब्बल वर्षभर कोरोनामुळे एसटी बंद राहिली. यानंतर संपामुळे फटका बसला. आता एसटी पुन्हा रुळावर येत आहे. एसटीचे उत्पन्न २५ लाखांपर्यंत पोहोचले आहे.
६५० चालक-वाहक परतले
यापूर्वी कामावर परतणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. यामुळे एसटीच्या फेऱ्या वाढल्या नव्हत्या. यामुळे प्रत्यक्षात एसटीच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या चालक-वाहकांची प्रतीक्षा होती.
नंतरच्या काळात चालक-वाहक कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली. प्रारंभी ही संख्या ४५० च्या घरात होती. आता ही संख्या ६५० च्या घरात पोहोचली आहे. यामुळे एसटीच्या फेऱ्या वाढण्यास मदत होईल.
महामंडळाला पुन्हा प्रवासी मिळविण्याचे आव्हान
प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचलेली एसटी बस रुसली होती. यामुळे पाच महिन्यांपासून प्रवासी पर्यायी व्यवस्थेच्या आधारावर अवलंबून होते. आता हा आधार त्यांना मोलाचा वाटत आहे. यामुळे एसटी सुरू झाल्यानंतर एसटी बसकडे किती प्रवासी वळतात, त्यावर एसटीचे पुढील उत्पन्न अवलंबून राहणार आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागेल.
एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी परिवहन महामंडळाचे कर्मचारी पूर्णत: प्रयत्न करीत आहे. लवकरच इतरही कर्मचारी कामावर रुजू होतील आणि प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सेवा मिळेल. - प्रताप राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी