एसटी दरीत कोसळताना वाचली; ५० प्रवासी थोडक्यात बचावले
By विशाल सोनटक्के | Published: May 4, 2024 01:41 PM2024-05-04T13:41:51+5:302024-05-04T13:44:23+5:30
महामार्गचे होतेय दुर्लक्ष : नांदगव्हाण घाटात चार दिवसात तिसरा अपघात
यवतमाळ : एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस दरीत कोसळताना वाचली. त्यामुळे ५० प्रवासी थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नांदगव्हाण घाटात ही घटना घडली. अपघातानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने एसटी बसला आधार देण्यात आला तेवढ्या वेळात प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन पूल अपघातक्षेत्र बनले आहे. चार दिवसांत याठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झाला आहे.
हदगाव (जि. नांदेड) येथून एसटी बस क्रमांक (एमएच २०, बीएल १६०५) ही बस ५० प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. विशेष म्हणजे मागील चार दिवसांतील नांदगव्हाण घाटातील हा तिसरा अपघात असून, दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता. त्यातील अपघातग्रस्त ट्रक अजूनही बाजूला करण्याचे सौजन्य महामार्ग पोलिसांनी दाखवलेले नाही.