एसटीचे तिकीट कमी झाले ट्रॅव्हल्स मात्र महागडीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 10:17 PM2022-11-04T22:17:24+5:302022-11-04T22:42:17+5:30
जागा मिळावी व सुखरुप प्रवास व्हावा या हेतूने अतिरिक्त रक्कम माेजून तिकीट खरेदी केले जाते. एसटी महामंडळाने दहा टक्के तिकीट वाढ केली होती. दिवाळी संपताच दर कमी केले. ट्रॅव्हल्सचे दर मात्र अजूनही कायम आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात कपात केली आहे; मात्र ही कपातही तुटपुंजी अशीच आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची लूट होत राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील नागरिकांना पुणे, मुंबई या महानगरात जाण्यासाठी यवतमाळातून खासगी ट्रॅव्हल्स व एसटी बसशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात घराबाहेर असलेले विद्यार्थी, चाकरमाने आपल्या गावी परततात. त्यामुळे अचानकच प्रवासी संख्या वाढते. हे हेरुन ट्रॅव्हल्स चालक मनमानी तिकिटाचे दर आकारतात. अक्षरश: तिकिटाच्या दरासाठी बोली लावली जाते.
जागा मिळावी व सुखरुप प्रवास व्हावा या हेतूने अतिरिक्त रक्कम माेजून तिकीट खरेदी केले जाते. एसटी महामंडळाने दहा टक्के तिकीट वाढ केली होती. दिवाळी संपताच दर कमी केले. ट्रॅव्हल्सचे दर मात्र अजूनही कायम आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात कपात केली आहे; मात्र ही कपातही तुटपुंजी अशीच आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची लूट होत राहते.
प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनीचे दर वेगळे
प्रवाशांची संख्या पाहून तिकिटाचे दर आकारले जातात. त्यातही ट्रॅव्हल्समधील पुढचा आणि खालचा बर्थ याचे तिकीट सर्वाधिक असते.
मागील बाजूला असलेल्या बर्थच्या तिकिटाचे दर कमी असते. बुकिंग करूनही अधिक रक्कम मोजावी लागते. या प्रकारे लूट होते.
ट्रॅव्हल्सविरोधात एकही तक्रार नाही
आरटीओंनी मनमानी तिकीट दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सची तक्रार करा, त्यासाठीचे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले.
ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त भाडे वसूल केले जात आहे. अशी एकही तक्रार आरटीओंकडे प्राप्त झाली नाही. त्यामुळे कारवाई झाली नाही.
एक नोव्हेंबरपासून एसटीचे तिकीट पूर्ववत
- दिवाळीत एसटी महामंडळाने तिकिटाचे दर दहा टक्के वाढविले होते. यातून महामंडळाला चांगली कमाई करता आली.
- प्रवाशांची संख्या आता रोडावली आहे. त्यामुळे तिकिटाचे दरही कमी करण्यात आले आहेत.
तक्रार केल्यास कारवाई निश्चित
ट्रॅव्हल्सच्या प्रकारानुसार तिकिटाचे दर निश्चित केले आहेत. त्यापेक्षा अतिरिक्त प्रवास भाडे घेतल्यास कारवाई करता येते. नागरिकांनी या संदर्भात योग्य ती तक्रार करावी. तक्रार प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी