‘एसटी’ टाकणार फेऱ्यांचा टाॅप गिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:00 AM2022-02-26T05:00:00+5:302022-02-26T05:00:49+5:30
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी महामंडळाकडून खासगी चालकांची भरती केली जात आहे. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढणार आहे. सध्या असलेली चालकांची टंचाई कमी होऊन आणखी बसफेऱ्या सोडल्या जाणार आहे. सद्यस्थितीत ८५ चालकांच्या भरवशावर ७५ ते ८० बसेस मार्गावर धावत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
कार्यशाळा कर्मचारी, पदोन्नती मिळालेले चालक यांचीही सेवा चालक म्हणून घेतली जात आहे. येत्या आठवडाभरात खासगी ७५ चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हाभरातील सर्व आगारांना हे चालक पुरविले जाणार आहे. पुसद आणि उमरखेड आगारातून नाममात्र बसफेऱ्या सोडल्या जात आहे. त्यामुळे या भागातील ग्रामीण नागरिकांची प्रवासासाठी मोठी गैरसोय सुरू आहे.
बसफेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित नसल्याने नागरिक बसस्थानकावर येण्यास टाळाटाळ करत असल्याचेही चित्र दिसत आहे. किमान तासाभराच्या फरकाने फलाटावर बसेस लागाव्या, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही होत आहे. परंतु चालक उपलब्ध नसल्याचे कारण महामंडळाकडून सांगितले जाते.
सध्या सायंकाळी ६ नंतर होतात फेऱ्या बंद
- बसस्थानकावरून संध्याकाळी ६नंतर बसफेऱ्या सोडल्या जात नाही. अनेक नागरिक बसस्थानकावर येऊन परत जातात. नाईलाजाने त्यांना खासगी बसने प्रवास करावा लागतो. बस सोडण्याच्या या वेळाही वाढविल्या जाव्या, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ग्रामीण भागातून शहरात प्रामुख्याने वैद्यकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना गावी जाण्यासाठी कुठलीही साधने नाहीत.
वाहकांचीही नियुक्ती करणार
बसफेऱ्या सुरू असल्या तरी तिकीट काढण्यासाठी वाहकांची टंचाई आहे. सद्यस्थितीत स्पाॅट बुकिंग केली जात असल्याने मार्गात मिळणारे प्रवासी घेतले जात नाही. केवळ बसस्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार सुरू आहे. बसमध्ये जागा असूनही प्रवासी घेतले जात नाही. वाहक असल्यास हा प्रश्नही निकाली निघणार आहे.
यवतमाळ विभागाला ७५ खासगीचालक नियुक्तीची परवानगी आहे. हा कोरम पूर्ण झाल्यानंतर बसफेऱ्या वाढविल्या जाईल.
- श्रीनिवास जोशी,
विभाग नियंत्रक, यवतमाळ