एसटी कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:12 AM2017-07-21T02:12:36+5:302017-07-21T02:12:36+5:30
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने गुरुवारी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने
प्रलंबित मागण्या : अनोख्या आंदोलनाने वेधले नागरिकांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने गुरुवारी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यवतमाळ येथील आर्णी मार्गावरील एसटी कार्यशाळेसमोर कर्मचाऱ्यांनी आपला सदरा काढून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले.
एसटी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी व सातवा वेतन आयोग महागाई थकबाकीसह देण्यात यावा, नियमबाह्य व कामगार विरोधी जाचक परिपत्रक रद्द झाले पाहिजे. शिस्त व अपिल कार्यपद्धतीचा दुरुपयोग बंद व्हावा, वेळापत्रकामधील त्रूटी दूर कराव्या, तसेच करार कायदे परिपत्रकाचा भंग करून आकसपूर्ण घेतलेले निर्णय रद्द करा, चालक कम वाहक या धोरणाचा फेरविचार करा, महिला कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवाव्या, चार वर्षांपासून न मिळालेले गणवेशाचे कापड त्वरित देण्यात यावे, चालक-वाहक विश्रांतीगृहामध्ये सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत पास देण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्ती वेतन देण्यात यावे आदी प्रमुख मागण्या एसटी कामगारांनी केल्या. या आंदोलनाची दखल न घेतल्यास चक्काजामसारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, विभागीय अध्यक्ष राहुल धार्मिक, अरुण वाघमारे, प्रकाश देशकरी, सलाउद्दिन शेख, प्रवीण बोनगीनवार, उगले, विलास डगवार, इंचोळकर, पंधरे, नितीन चव्हाण, दिगांबर गुघाणे, प्रीतम ठाकूर, गोविंद, योगेश रोकडे, अंकुश पाते, मुंजेकर, सलीम शहा, सै. इरफान, प्रवीण राऊत, शेख लाल, अरुण काळे, मो. इस्तीयाक, नाईकर, उत्तरवार, गणेश राठोड, रंजना किरणापुरे, उत्तम पाटील, डी.के. भगत, भानारकर, रतन पवार, प्रमोद माथने आदींसह असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.