‘एसटी’चा संप ऐतिहासिक ठरतोय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 01:36 PM2021-12-06T13:36:10+5:302021-12-06T13:46:12+5:30
यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला.
विलास गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७३ वर्षांच्या कारकीर्दीतील यावेळचा कर्मचारी संप ऐतिहासिक ठरतो आहे. यापूर्वी झालेल्या तीनपैकी सर्वाधिक काळ चाललेला १९७८ चा संप सहा दिवसांचा होता. विशेष म्हणजे, त्यावेळचे सर्व संप आर्थिक बाबींशी निगडित होते. शिवाय, कर्मचाऱ्यांवर कारवाईसुद्धा अपवादानेच झाली होती. मात्र, आज सुरू असलेल्या संपाचा विषय वेगळा आहे. याठिकाणी सरकारची हतबलता स्पष्टपणे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचे ३६ दिवस पूर्ण झालेले आहेत. पण यावर कुठलाही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट तो चिघळतच चालला आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे महामंडळ नाममात्र कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसफेऱ्या सुरू करत आहे. चालक, वाहक, यांत्रिक हे प्रमुख कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. एसटीच्या इतिहासात कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या आणि गंभीर स्वरूपाच्या कारवाया पहिल्यांदाच झाल्या आणि होत आहेत.
यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला. करार लवकर करून वेतनवाढ मिळावी, ही त्यांची मागणी होती. या संपात नियमित कर्मचारी ताकदीने उतरले होते. नवीन कर्मचाऱ्यांचा यात सहभाग नसल्याने प्रवासी सेवा बऱ्यापैकी सुरू होती.
सातवा वेतन आयाेग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी २०१६ मध्ये चार दिवसांचा संप करण्यात आला. वेतन आयोग मिळाला नसला तरी ४८४९ कोटींचे पॅकेज देण्यात आले होते. संपापूर्वी केवळ ७४१ कोटीच देण्याची तयारी होती. त्यावेळी संपात उतरलेल्या रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. मात्र, कालांतराने त्यांना कामावर घेण्यात आले. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नव्हता. यावेळच्या संपाची न भुतो... अशी नोंद होत आहे.
दिवाळीतच संप, प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सर्व संप दिवाळीतच केले आहेत. या काळात प्रवाशांची वर्दळ असते. बसेस बंद असल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे एसटीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. याहीवेळी दिवाळीपासूनच संप सुरू करण्यात आला. मात्र, संप मिटविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
८०० कोटी रुपयांचे नुकसान
मागील ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळी, पंढरपूर यात्रा कॅश करण्याची संधी महामंडळाला मिळाली नाही. शिवाय, लग्नसराई, प्रासंगिक कराराच्या माध्यमातूनही कमाई करता आली नाही. आता एसटीपासून दूर गेलेला प्रवासी जोडण्याचे मोठे आव्हान महामंडळापुढे आहे.