एसटी पंक्चर; खासगी वाहतूकदारांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:57 PM2021-10-28T17:57:24+5:302021-10-28T18:19:37+5:30
जिल्ह्यातील नऊही आगारांमध्ये परिवहन महामंडळाचे कर्मचारी कामावर न आल्याने ३४३ बसफेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या. यातून एसटी महामंडळाचे १७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेेल्या बेमुदत उपोषणाने एसटीची चाके थांबली आहेत. जिल्ह्यातील नऊही आगारांमध्ये परिवहन महामंडळाचे कर्मचारी कामावर न आल्याने ३४३ बसफेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या. यातून एसटी महामंडळाचे १७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांना विविध अडचणीचा सामना करावा लागला. याचा फायदा खासगी वाहनचालकांना झाला.
राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसले आहेत. बुधवारी जिल्हास्तरावर हे उपोषण होते. गुरुवारी आगारस्तरावर उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. या आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाचे ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले. यामुळे एसटीची चाके थांबली. परिवहन महामंडळाच्या २६३१ कर्मचाऱ्यांपैकी १९०३ कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
नऊ आगारांपैकी यवतमाळ आणि वणी आगारात ११ पर्यंत वाहतूक सुरू होते. यानंतर सर्वच ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. परिवहन महामंडळ विविध मार्गांवर ४३० फेऱ्या करते. यातील ३४२ फेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या. ५८ हजार किलोमीटरचा प्रवास आंदोलनामुळे ब्रेक झाला. दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने सुटयामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाडयाच आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांना अचानक आपला प्रवास रद्द करावा लागला. अनेकांंची वेळेवर धावपळ झाली. त्यांना अधिक दरात खासगीने प्रवास करावा लागला.
नऊ आगारांत प्रशासन अधिकाऱ्यांच्या भेटी
उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. मात्र, आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते, तर दुसरीकडे तोडगा काढण्यासाठी बैठकाही सुरूच होत्या.
अशा आहेत रद्द झालेल्या फेऱ्या
नव आगारातून ३४२ फेऱ्या रद्द झाल्या. यामध्ये यवतमाळ २३, पुसद ५९,, वणी ४५, उमरखेड ३२, दारव्हा ५०, पांढरकवडा ४५, नेर २९, दिग्रस ३१ तर राळेगाव मधील २८ फेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या.
जिल्ह्यात वणी आगारातून ६ आणि यवतमाळ आगारातून २५ बसफेऱ्या झाल्या. दुपारनंतर संपूर्ण ऑपरेशन थांबलेेलेे होते. एकूणच वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. राळेगाव, वणी आणि पांढरकवडा आगाराला भेटी दिल्या.
श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ