मृत शेतकऱ्याच्या घरात प्रशासनाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:21 PM2018-04-20T23:21:42+5:302018-04-20T23:21:42+5:30

शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे.

The stance of the administration of the deceased farmer's house | मृत शेतकऱ्याच्या घरात प्रशासनाचा ठिय्या

मृत शेतकऱ्याच्या घरात प्रशासनाचा ठिय्या

Next
ठळक मुद्देकाहीही बोलू नका : आत्महत्येला अपघात दाखविण्याचा प्रयत्न, गाव मात्र अस्वस्थ

अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे. मृताच्या वारसांनी कोणाशीही काहीही बोलू नये, यासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ चमूच्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आली.
सावळेश्वर गावात १४ एप्रिल रोजी माधवराव रावते या वृद्ध शेतकऱ्याने शेतात सरण रचून आत्महत्या केली. मात्र सावळेश्वर हे मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव असल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी ही शेतकरी आत्महत्या नव्हेच, असा कांगावा सुरू केला. माधवरावांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन दिवसांनी ही बाबपुढे आली. १६ एप्रिल रोजी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार व कार्यकर्त्यांनी या गावात धडक दिल्यावर जळून खाक झालेल्या माधवरांच्या कलेवराला वाचा फुटली. मात्र १७ एप्रिलला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन या शेतकऱ्याचे कर्ज माफ झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष गावकऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. ते म्हणाले. आमच्या गावात २५० शेतकरी कर्जमाफीत बसतात. पण एकालाही शासनाने आतापर्यंत कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र दिले नाही. माधवराव गेल्यानंतर त्यांचे कर्ज माफ झाल्याचे सांगून काय फायदा?
‘लोकमत’ चमू माधवराव रावते यांच्या घरी पोहोचली, तेव्हा त्यांच्या घरात तलाठी, पोलीस पाटील, मुख्यमंत्री दूत यांनी ठिय्या दिलेला होता. माधवरावचा मुलगा गंगाधर काही बोलू इच्छित असला तरी या अनामिक दबावामुळे तो बोलू शकत नव्हता. गावकऱ्यांनी सांगितलेली कहाणी भयंकर आहे. माधवरावचे वावर पूर्णत: मुरमाड जमिनीचे आहे. त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी तर जमिनी कसणे सोडून दिले आहे. पण त्यांना शेतीविना पर्याय नव्हता. कर्जमाफी जाहीर झाली, पण नव्या कर्जाचे काय? बोंडअळीच्या मदतीत त्याचे नाव आले, पण मदत कुठे मिळाली? असे अनेक प्रश्न गावकºयांनी उपस्थित केले.
गावातल्या कार्यकर्त्यावर रोष
माधवराव रावते यांची आत्महत्या झाल्यापासूनच गावातील एक भाजपा कार्यकर्ता सतत ही आत्महत्या नसून अपघातच आहे, असे सर्वांना सांगत आहे. आता गावकरीही त्या कार्यकर्त्याविरुद्ध रोष व्यक्त करू लागले आहे. माधवराव पुंजाणे पेटवताना जळले, तर मग त्यांच्या चपला, काठी, चष्मा कसे बाजूला सलामत राहिले, असा या गावकºयांचा प्रश्न आहे.

Web Title: The stance of the administration of the deceased farmer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.