मुलांच्या पाठीशी उभे राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:33 PM2018-03-06T23:33:34+5:302018-03-06T23:33:34+5:30
पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यासाठी मुलांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
घाटंजी : पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यासाठी मुलांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांनी केले.
येथील शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रा. राजू तोडसाम होते. नगरपरिषद उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बाजार समती सभापती अभिषेक ठाकरे, तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार भावसार, उपअभियंता विनायक ठाकरे, डॉ. अरविंद भुरे आदी मान्यवर उपस्थित होते. राजे छत्रपती सामाजिक संस्था व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मूळचे यवतमाळचे आणि भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक आकाश चिकटे यांना यंदाचा ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांनी आपली जडणघडण उलगडताना आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आईवडिलांना असल्याचे सांगितले.
आमदार राजू तोडसाम म्हणाले, आकाश चिकटेसारखे खेळाडू जिल्ह्यासाठी भूषणावह आहेत. प्रत्येकाने शिवरायांचे संस्कार अंगीकारून समाज व राष्ट्राच्या विकासात हातभार लावावा. पहिल्या पर्वात प्रा. संतोष दरणे यांचे व्याख्यान झाले. सिद्धार्थ खिल्लारे यांच्या हास्यसम्राट कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. प्रास्ताविक व संचालन राजेश उदार यांनी केले. आभार दीपक महाकुलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रफुल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजू गिरी, प्रमोद टापरे यांनी परिश्रम घेतले.
एमपीएससीतील गुणवंतांचा गौरव
छत्रपती शिवराय सामाजिक सभागृहाच्या संरक्षक भिंतीसाठी आमदार राजू तोडसाम यांनी पाच लाखांचा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला. त्याबद्दल उत्सव समितीच्या वतीने आमदार तोडसाम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विशाल भेदूरकर, आकाश जाधव, अतुल वानखडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.