स्थायी समितीत आरोग्यावरून उडाली खडाजंगी
By admin | Published: September 4, 2016 12:48 AM2016-09-04T00:48:24+5:302016-09-04T00:48:24+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आरोग्य विभागाच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आरोग्य विभागाच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. नियुक्त्यांमध्ये सोयीच्या ठिकाणासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही आरोग्य विभागाने दिशाभूल केल्याचा आरोप सदस्यांनी केला.
नवीन बृहत आराखड्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात काही पदांची नव्याने निर्मिती करण्यात आली. या पदांवर नवीन नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र आरोग्य अधिकारी जुन्याच कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला. आरोग्य सेविका खोडके यांची पुसद पंचायत समितीअंतर्गत बदली करण्यात आली होती. त्याला त्यांनी औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्यांची याचिका खारीज केली. तरीही त्यांना सोयीच्या असलेल्या यवतमाळ तालुक्यातील डोर्ली उपकेंद्रात बदली देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या बदलीची फाईल थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेली. यात चक्क सीईओंचीच दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
आरोग्य सेविका थूल यांची कळंब तालुक्यातील माटेगाव उपकेंद्रातून वणी तालुक्यातील उकणी येथील उपकेंद्रात बदली करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. मात्र त्यांनाही पुन्हा सोयीच्या माटेगाव उपकेंद्रात बदली देण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ हरदास यांना रामपूर केंदातून त्यांचे पदच नसलेल्या सारवगड येथील आरोग्य केंद्रात पाठविले. विशेष म्हणजे तत्पूर्वी त्यांना बढतीच्या वेळी कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. सुनील तलमले यांना सावरगड येथून दहेगाव केंद्रात नियुक्ती देण्यात आली. ते औद्योगिक न्यायालयात गेले. इतरांच्या याचिका खारीज झाल्या. त्यामुळे तलमले यांच्या प्रकरणाचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावरून प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.डी.डी.भगत आणि सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली होती. (शहर प्रतिनिधी)
लिपिकाची भूमिका ठरली महत्त्वाची
कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील एक लिपीक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा कर्मचारी चक्क मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ.एम.एम.राठोड यांच्या कार्यकाळात सन २0१३ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत हा कर्मचारी निलंबित झाला होता. त्यांच्या पाच वेतनवाढी रद्द करण्यात आल्या आहे. तरीही सोयीची नियुक्ती देण्यात हा कर्मचारी वाक्बागार असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.