उमरखेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम प्रारंभ

By admin | Published: January 15, 2016 03:15 AM2016-01-15T03:15:11+5:302016-01-15T03:15:11+5:30

शहरातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि अकोला, हैद्राबाद आंतरराज्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम गुरूवारी सकाळपासून सुरू झाली.

Start of encroachment campaign in Umarkhed | उमरखेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम प्रारंभ

उमरखेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम प्रारंभ

Next

बघ्यांची गर्दी : व्यापाऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव
उमरखेड : शहरातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि अकोला, हैद्राबाद आंतरराज्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम गुरूवारी सकाळपासून सुरू झाली. या मोहिमेने एकच खळबळ उडाली असून अनेकजण स्वत:हूनच अतिक्रमण काढताना दिसत होते, तर ४० फुटाची सीमा ५० फुटांवर पोहोचल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला. याच मुद्यावरून व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.
उमरखेड शहरात सकाळी ७ वाजता गांधी चौकातून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांच्या नेतृत्त्वात अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील महामार्गाच्या दोनही बाजूचे अतिक्रमण काढणे सुरू केले. रस्त्याच्या मध्यभागापासून ४० फुटांपर्यंत असलेले अतिक्रमण काढले जात आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण काढले जाणार असल्याची सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारपासूनच अनेकांनी आपली अतिक्रमणित दुकाने काढून घेतली. तर सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची दुकाने जेसीबीच्या सहाय्याने काढणे सुरू झाले. ही मोहीम सुरू असताना बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेक लहान मोठे दुकानदार धास्तावले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना ४० फुटापर्यंत असलेले अतिक्रमण काढले जाणार होते. मात्र अचानक ५० फुटापर्यंतचे मोजमाप होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. तेव्हा अधिकाऱ्यांनी ४० फुटापर्यंतच मोजमाप होत असल्याचे सांगितल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. महामार्ग प्राधिकरणासह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. यानंतर कुणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. मोहिमेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच बांधकाम आणि नगरपरिषदेचे अधिकारीही उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Start of encroachment campaign in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.