उमरखेड ते निंगनूरमार्गे किनवट बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:49+5:302021-08-02T04:15:49+5:30
उमरखेड : तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागात एसटी महामंडळाची बस सुविधा उपलब्ध नाही. व्यापारी, विद्यार्थी व गरजू प्रवाशांची प्रचंड हेळसांड ...
उमरखेड : तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागात एसटी महामंडळाची बस सुविधा उपलब्ध नाही. व्यापारी, विद्यार्थी व गरजू प्रवाशांची प्रचंड हेळसांड होत आहे. त्यामुळे निंगनूर ते फुलसावंगीमार्गे किनवट बस सुरू करावी, अशी मागणी निंगनूर ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव घेऊन उमरखेड आगार प्रमुखांकडे केली.
मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उमरखेड ते निंगनूरमार्गे फुलसावंगी, किनवट जाणारी ही बस बंद केली. सध्या कोरोनाचा प्रभाव ओसरलेला असतानासुद्धा ही बस सेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बंदी भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बस सुरू नसल्याने खासगी वाहनधारकांची मनमानी सुरू आहे. अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारले जात आहे. गरजू प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनधारकांकडून आर्थिक लूट सहन करावी लागत आहे.
गरजू प्रवासी, नागरिकांसह विद्यार्थी, व्यापारी व रुग्णांनाही बस नसल्याने फटका सहन बसत आहे. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेऊन उमरखेड आगाराने निंगनूर-फुलसावंगीमार्गे किनवट बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचा ठराव २७ जुलैला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत पारित केला.
बॉक्स
ठरावासह दिली आगारात धडक
ठराव घेऊन सरपंच सुरेश बरडे, उपसरपंच महेमुनिसा वलीउल्लाखान, सदस्य श्याम नखाते, अंकुश राठोड, विजय भोरकडे, रत्नमाला अंभोरे, पिंकू जाधव, छाया घावस आदींनी उमरखेड आगार गाठले. तेथे आगार प्रमुखांना ठरावाची प्रत सादर केली. दीड वर्षांपासून ही बस बंद असल्याने निंगनूर, फुलसावंगी, किनवट, चातारी, कोप्रा बोरी आदी गावांमधील नागरिकांची लूट सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.