ढाणकी आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:34+5:302021-04-29T04:32:34+5:30
सध्या अनेक रुग्ण ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली ...
सध्या अनेक रुग्ण ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करणे परवडत नाही. कुठेही बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. घरातील कर्ते पुरुष आणि महिला मृत्युमुखी पडल्याच्या घटना काही दिवसात ढाणकी व परिसरात घडल्यामुळे सामान्य कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर सुरू केल्यास ढाणकी व परिसरातील जवळपास ५० गावांतील नागरिकांना उपचार घेता येईल. रुग्णांना उपचाराअभावी आपले प्राण गमावण्याची वेळ येणार नाही. यातून अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत आहे. संडास, बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था आहे. बहुुतांश खोल्या रिकाम्या आहेत. या जागी काेविड केअर सेंटर सुरू करून ढाणकी व परिसरातील ५० गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. याबाबत गांभीर्याने विचार करून त्वरित येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी वंचित बहुुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत ऊर्फ जॉन्टी विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांच्याकडे केली आहे. हे निवेदन पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे यांनाही देण्यात आले.