उमरखेड येथे मराठा साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ
By admin | Published: January 17, 2015 11:06 PM2015-01-17T23:06:19+5:302015-01-17T23:06:19+5:30
श्रोत्यांनी खचाखच भरलेली साहित्य नगरी. मुद्रित भाषण सोडून थेट श्रोत्यांशी संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी साधलेला संवाद.
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : श्रोत्यांनी खचाखच भरलेली साहित्य नगरी. मुद्रित भाषण सोडून थेट श्रोत्यांशी संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी साधलेला संवाद. कवितांची पेरणी आणि त्यातच बाप या कवितेने इंद्रजित भालेराव यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
निमित्त होतं दहाव्या राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाचं. उमरखेड येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात उभारण्यात आलेल्या विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरीत संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजित भालेराव टाळ्यांच्या कडकडाटात भाषणासाठी उभे झाले. कवी मनाच्या आणि शेतकऱ्यांची दु:खे अगदी जवळून अनुभवणाऱ्या या कवीने साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण वाचून दाखविण्याच्या परंपरेला फाटा दिला. माझे भाषण तुम्ही वाचले असेल असे म्हणत मी लेखी भाषण सांगणार नाही. इथे मुलही उपस्थित आहेत. मी त्यांच्यासाठी कविता म्हणणार, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जिजाऊंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मी लेखन केले आहे. माझे साहित्य भावनेच्या मापदंडात तोलू नका, असे सांगत भालेराव म्हणाले, जिजाऊच्या बालपणाची कविता लिहिणे खूप अवघड गोष्ट होती. पोरांनो परीक्षा आली की, टेन्शन येते. टेन्शन आले की मी पोटभर जेवतो, खूप झोपतो, त्यावेळी मला स्वप्न पडतात. त्या स्वप्नात जिजाऊ आल्या आणि मी त्यांच्या बालपणावर कविता करू शकलो. ‘जिजाऊ शिकते... एकुलती एक’ ही कविता स्वत: म्हणत प्रेक्षकांकडूनही म्हणवून घेतली. ‘जिथे राबतो तो माझा शेतकरी बाप’ ही कविता भालेराव यांनी गाऊन सादर केली. तेव्हा संपूर्ण श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आपल्या कवितेतून शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारे भालेराव म्हणाले, शेतकरी म्हणजे मराठा नाही जो शेतकरी तो मराठा, असे म्हणत शेतकऱ्यांच्या दु:खातच सामाजिक भूमिका दडली असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणाने संपूर्ण सभागृहाला चिंतनासोबतच हास्यात बुडविले.