शिक्षक पदभरती तातडीने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:15 PM2018-01-30T23:15:48+5:302018-01-30T23:16:16+5:30
पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यवतमाळात आले असता स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. १२ ते २२ डिसेंबरदरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. मात्र अजूनही शिक्षक पदभरती संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल शासनस्तरावर दिसून येत नाही. त्यामुळे चाचणी दिलेले सर्व अध्यापक संभ्रमावस्थेत आहेत. उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. परंतु, त्यात विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कुठेही नोंद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरांसहीत विद्यार्थ्यांपर्यंत उत्तरतालिका पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली.
राज्यात २००९-१० पासून शिक्षक पदभरती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे असंख्य डीएड व बीएड पात्रताधारक विद्यार्थी बेरोजगार आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतेवेळी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परिषदेचे आशीष रिंगोले, अभय राऊत, अनिल निम्मलवार, अमन युसूफ खान, गजानन चव्हाण, मनोज साबापुरे, ऋणेश बोरुले, अजय दुबे, अविनाश दिडशे, गणेश पोलचेट्टीवार, प्रतिक भगत, प्रफुल्ल रिंगोले, युवराज आडे, कैलास उलमाले, प्रशांत खरतडे, जगदीश मॅकलवार, अजय चौधरी, सागर भोयर, चेतन हांडे, श्रीकांत गोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.