खरेदी सुरू करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

By admin | Published: April 11, 2017 12:05 AM2017-04-11T00:05:30+5:302017-04-11T00:05:30+5:30

व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या ईलेक्ट्रॉनिक काट्याच्या वादातून येथील बाजार समितीचे व्यवहार १६ दिवसांपासून ठप्प पडले.

Start shopping, otherwise deal with the action | खरेदी सुरू करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

खरेदी सुरू करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

Next

व्यापाऱ्यांना अल्टीमेटम : यवतमाळ बाजार समितीमध्ये १६ दिवसांपासून शेतकरी संकटात
यवतमाळ : व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या ईलेक्ट्रॉनिक काट्याच्या वादातून येथील बाजार समितीचे व्यवहार १६ दिवसांपासून ठप्प पडले. आता पुन्हा खरेदी सुरू करण्यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांना बुधवारपर्यंतचा अवधी दिला आहे. या कालावधीत खरेदी सुरू न झाल्यास व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सुस्थितीत सुरू असलेल्या येथील बाजार समितीचे व्यवहार अचानक ठप्प पडल्याने शेतकऱ्यांचा नाहक बळी जात आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने आवश्यक कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात विकावा लागत आहे. आता बाजार समितीने शेतकरी हित लक्षात घेत ठोस पावले उचलण्याची तयारी सुरू केली. व्यापाऱ्यांच्या मालकीच्या ईलेक्ट्रॉनिक काट्याच्या भूमिकेला बाजार समितीने विरोध दर्शविला. वेगाने मोजणीसाठी सध्याची पद्धतीच योग्य असल्याचा दावा बाजार समितीने केला. त्यानुसार धान्य खरेदी करण्याची भूमिका बाजार समितीने घेतली आहे. या पद्धतीत कुठलाही बदल न करता व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला. यात त्यांना बुधवारपर्यंत खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. अन्यथा कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा दिला. बुधवारी दुपारी ४ वाजतापर्यंत बाजार समिती खरेदी सुरू होण्याची वाट बघणार आहे. त्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयानुसार व्यापाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.
खरेदी बंद असल्याने संचालकांची यापूर्वी बैठक झाली. मात्र ती अर्ध्यावरच संपली. तेव्हापासून हा प्रश्न रेंगाळत आहे. या प्रकरणात आता समन्वयाची गरज आहे. मात्र या समन्वयासाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न आहे. बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या वादात शेतकरी मात्र नाहक भरडले जात आहे. (शहर वार्ताहर)

बाजार समिती म्हणते, वजनकाटे का बदलायचे?
व्यापाऱ्यांनी बाजार समितीला आपल्याच ईलेक्ट्रॉनिक काट्यांनी खरेदी करण्यासाठी निवेदन दिले. त्याला बाजार समितीने धुडकावून लावले. वजनमाप व्यवस्थित असताना काटे का बदलायचे, व्यापाऱ्यांचे काटे बसविण्यासाठी एवढा आग्रह का, असा बाजार समितीचा प्रश्न आहे. शेतकरी अडचणीत असताना व्यापाऱ्यांनी ही भूमिका का घेतली, असाही प्रश्न आहे. आत्तापर्यंत सेस कमी करण्यापासून तो निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यात आला. असे असतानाही व्यापाऱ्यांचा त्यांच्या काट्यासाठी अट्टाहास का, असा प्रश्न बाजार समितीने उपस्थित केला आहे.
काटे तुमचे, हमाल आमचे : व्यापाऱ्यांची भूमिका
ईलेक्ट्रॉनिक काट्यासंदर्भात बाजार समितीला व्यापाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी निवेदन दिले. तथापि बाजार समितीच्याच ईलेक्ट्रॉनिक काट्यावर शेतमालाचे मोजमाप करण्यास व्यापारी तयार आहेत. पूर्वीप्रमाणे हे मोजमाप करावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र ईलेक्ट्रॉनिक काटे बाजार समितीचे असले, तरी हमाल मात्र व्यापाऱ्यांचे असतील, अशी मागणी आता व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत बाजार समितीने निर्णय घ्यावा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोजमापाची सध्याच्या प्रचलित पद्धतीची व्यापाऱ्यांनीच मागणी केली होती. यामुळे वेगाने काम सुरू झाले. ही पद्धत बरोबर आहे. आता या पद्धतीला व्यापारीच विरोध करीत असून त्यांची भूमिका चुकीची आहे.
- रवींद्र ढोक
सभापती, बाजार समिती, यवतमाळ

व्यापाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीनुसार मोजमाप हवे आहे. त्याकरिता बाजार समितीच्या ईलेक्ट्रॉनिक काट्यावरही मोजमाप चालेल. मात्र हमाल व्यापाऱ्यांचे असतील.
- गोविंद भरतीया,
व्यापारी, यवतमाळ

Web Title: Start shopping, otherwise deal with the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.