१५ दिवसांत वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या माती कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 08:23 PM2018-06-18T20:23:57+5:302018-06-18T20:24:05+5:30
वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. त्यात येत्या १५ दिवसांत कळंब ते यवतमाळ दरम्यान रुळ टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या माती कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
खासदार भावनाताई गवळी यांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे वेगाने काम व्हावे म्हणून रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. यवतमाळात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, रेल्वेचे कार्यकारी अभियंता आर.के.धनगर, डेप्युटी चिफ इंजिनियर एच.एल.कावरे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील या रेल्वे मागार्साठी आवश्यक असलेले जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच अधिग्रहणाचे हे काम १00 टक्के पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती चंद्रकांत जाजू यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यात कळंबपर्यंत गलमगाव, खुटाळा, गंगादेवी, कामठवाडा, एकलासपूर परिसरात माती काम सुरु झाले आहे. येत्या १५ दिवसांत कळंबपासून यवतमाळपर्यंत माती कामास प्रारंभ केला जाणार आहे. यापाठोपाठ जुलै महिन्यापासून यवतमाळ ते दारव्हा व नंतर लगेच दिग्रसपर्यंत माती कामास प्रारंभ केला जाणार आहे. या कामाचे टेंडर काढण्यात येईल. या मार्गावर पुसद तसेच उमरखेड भागात भुयार बांधावे लागणार असून त्याचीही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे काम सेक्शनवाईज करण्यात येत असल्याने या कामाला गती प्राप्त होत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड हा प्रकल्प ‘पीएम पोर्टल’वर असूनही प्रकल्पावर कार्यरत कर्मचारी कमी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे भावनाताई गवळी यांनी सांगितले.
यवतमाळ-आर्णी मार्गावरील एका हॉटेलजवळून ही रेल्वे लाईन जाणार असल्याने तसेच याच ठिकाणावरुन राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्याने येणारी समस्या दूर करण्याच्या उद्देशाने आधीच हालचाली करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
रुळ टाकण्यास होईल सुरुवात
माती काम झाल्याबरोबर रेल्वेचे रुळ टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील माती काम येत्या आठ ते दहा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. त्यामुळे यवतमाळकरांच्या स्वप्नातील रेल्वे लवकरच अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसून येत आहे.
प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना
सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खासदार भावनाताई गवळी यांनी या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना रेल्वेसह सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाची सध्याची किंमत ३१६८ कोटीपर्यंत पोहोचली आहे. माती काम पूर्ण करुन लवकर रेल्वेचे रुळ टाकण्याची प्रक्रिया प्रारंभ करा, असेही भावनाताई गवळी यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.