राज्य बँकेकडून हवे दीडशे कोटी रुपये
By admin | Published: June 22, 2017 12:54 AM2017-06-22T00:54:55+5:302017-06-22T00:54:55+5:30
शासनाचे शेतकऱ्यांना बि-बियाणे खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपये अग्रीम म्हणून कर्ज देण्याचे आदेश दिले असले तरी
जिल्हा बँक : शेतकऱ्यांना दहा हजार अग्रीम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाचे शेतकऱ्यांना बि-बियाणे खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपये अग्रीम म्हणून कर्ज देण्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तेवढ्या पैशाची सोय नाही. म्हणूनच या अग्रीमसाठी लागणारे सुमारे दीडशे कोटी रुपये राज्य सहकारी बँकेला मागण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार प्रमाणे अंदाजे दीडशे कोटी रुपये अग्रीम कर्ज द्यावे लागणार आहे. मात्र एवढी रक्कम बँकेकडे नाही म्हणून ही रक्कम राज्य बँकेला प्रस्ताव सादर करून मागितली जाणार आहे.
७१ कोटींच्या जुन्या नोटांचा मार्ग मोकळा
नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांकडून स्वीकारलेले ७१ कोटी रुपये अनेक महिने पडून होते. या जुन्या नोटांच्या फेरबदलाबाबत साशंकता असल्याने रिझर्व्ह बँकेने नाबार्डकडून दोन-तीनदा त्याचा हिशेब व तपासणी केली. अखेर ७१ कोटींच्या या नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे.