राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खडकूही नाही; वणीतील सभेत आघाडी सरकारवर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 08:13 PM2021-10-01T20:13:09+5:302021-10-01T20:13:35+5:30
Yawatmal News शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
यवतमाळ : सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापसाची बोंडे काळी पडली. सोयाबीनच्या शेंगात दाणे नाहीत. अशा परिस्थितीत आघाडी सरकार केवळ घोषणाबाजीत दंग आहे. प्रत्यक्षात या सरकारने एक खडकूही दिला नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. (Devendra Fadanavis )
नगरपालिकेच्या वतीने वणी शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी नगरविकास राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, वणीचे नगराध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, भाजप नेते दिनकर पावडे, जि.प. सदस्या मंगला पावडे, विजय चोरडिया, विजय पिदुरकर, रवी बेलूरकर आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी येथे दाखल होताच निळापूर शेतशिवारातील शेतकरी कृष्णराव गोविंद झट्टे यांच्या शेतात भेट देऊन पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पार पडलेल्या सभेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.