राज्यात पोलीस निरीक्षकांच्या सव्वाचारशे जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:32 PM2018-06-29T15:32:29+5:302018-06-29T15:35:55+5:30
राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे.
राज्यातील सहायक पोलीस निरीक्षकांना बढती देण्याच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालयाने २७ जून रोजी महसूल विभाग निहाय पोलीस निरीक्षकांच्या रिक्त पदांची स्थिती जाहीर केली. त्यानुसार कोकण विभाग क्र. २ अंतर्गत निरीक्षकांच्या सर्वाधिक २१४ जागा रिक्त असल्याची नोंद आहे. नागपूर विभागात ५५, अमरावती २७, औरंगाबाद ३२, कोकण विभाग क्र. १ मध्ये ५, नाशिक २७ तर पुणे महसूल विभागांतर्गत निरीक्षकांच्या ६४ जागा रिक्त आहेत.
राज्यात तालुकास्तरावरील सर्व पोलीस ठाणेप्रमुख हे निरीक्षक दर्जाचे आहे. मात्र तालुक्यांच्या तुलनेत सक्षम पोलीस निरीक्षकांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्या पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाºयांना ठाणेदार म्हणून नेमण्याची वेळ येते.
कनिष्ठांना ठाणेदार बनविण्याचा प्रयोग
अमरावती ग्रामीणमध्ये एपीआय व पीएसआयला अनेक ठिकाणी ठाणेदार बनविण्यात आले आहे. यामागे निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता, अकार्यक्षमता की कनिष्ठांना संधी यापैकी नेमके कोणते कारण आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु कनिष्ठांना ठाणेदार बनवून प्रशासनाने निरीक्षकांच्या अकार्यक्षमतेवर मोहर उमटविल्याचे पोलीस दलात मानले जाते. यवतमाळातही पीआयऐवजी एपीआयला तालुकास्तरीय पोलीस ठाण्याचे ठाणेदार बनविण्याचा प्रयोग झाला आहे. त्यामागे मात्र राजकीय इच्छाशक्ती प्रबळ ठरल्याचेसांगण्यात येते.
२९ एपीआय पदोन्नतीच्या यादीत
पोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागा एपीआयला पदोन्नती देऊन भरल्या जाणार आहे. परंतु राज्यात निरीक्षकांच्या ४२४ जागा रिक्त असताना पदोन्नतीसाठी केवळ २९ सहायक निरीक्षकांची यादी विचाराधीन आहे. त्यांना नेमकी कोणत्या महसुली संवर्गात नियुक्ती हवी, याबाबत पसंतीक्रम मागण्यात आला आहे. चक्राकार पद्धतीने या नियुक्त्या होणार आहेत.
३९५ जागा रिक्तच राहणार
केवळ २९ एपीआयलाच बढती मिळाल्यास राज्यात निरीक्षकांच्या ३९५ जागा पुन्हा रिक्त राहणार आहे. आगामी सण-उत्सव व निवडणुका लक्षात घेता निरीक्षकांच्या एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्यास उपलब्ध पोलीस अधिकाºयांवर कामाचा ताण वाढणार एवढे निश्चित.