प्रदेशाध्यक्ष बदलले, जिल्हाध्यक्ष केव्हा बदलणार?
By admin | Published: March 3, 2015 01:18 AM2015-03-03T01:18:08+5:302015-03-03T01:18:08+5:30
काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलविताच जिल्हा काँग्रेसमध्येसुद्धा अध्यक्ष
काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर : तरुण रक्ताला वाव द्यावा, माजी आमदार-ज्येष्ठ नेत्यांनी बनावे मार्गदर्शक
यवतमाळ : काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलविताच जिल्हा काँग्रेसमध्येसुद्धा अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस कार्यकर्ते सोमवारी दिवसभर जिल्हाध्यक्ष केव्हा बदलणार, नवा अध्यक्ष कोण होणार याचा मोबाईलवरून अंदाज घेताना दिसून आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावाची घोषणा सोमवारी करण्यात आली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा विधानसभेनंतर लगेच राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूर करून पक्षाने महाराष्ट्राची जबाबदारी मराठवाड्यात मराठा लॉबीकडे सोपविली. अशोकराव चव्हाण यांच्याकडे प्रदेश काँग्रेसची धुरा आल्याने आता यवतमाळसह सर्वत्रच चेंज होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे माजी आमदार वामनराव कासावार यांच्याकडे आहे. सुमारे सहा वर्षांपासून ते ही जबाबदारी सांंभाळत आहेत. मात्र लोकसभेपाठोपाठ विधानसभेतसुद्धा कासावारांंचा परफॉर्मन्स माणिकराव ठाकरेंप्रमाणेच राहिला आहे. जिल्ह्यात लोकसभेचे उमेदवार पराभूत झाले. विधानसभेत पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या. याच कारणावरून जिल्हाध्यक्ष बदलाची कार्यकर्त्यांमधील मागणी आहे. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेबाबत कार्यकर्ते आक्रमक आहे. जिल्ह्यातील माजी आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे, पक्षाची जबाबदारी तरुण रक्ताच्या खांद्यावर सोपवावी, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
शिवसेनेने संजय राठोड यांच्या रुपाने तरुण रक्ताकडे राज्यमंत्रीपद व पक्ष वाढीची जबाबदारी सोपविली आहे. भाजपातही जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे सुरू असून मार्चनंतर विद्यमान जिल्हाध्यक्ष बदलविण्याची तयारी सुरू आहे. पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्षांची लॉबींग सुरू असली तरी त्यांना किती आमदारांंचा पाठींबा मिळतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. आमदारांना नवा जिल्हाध्यक्ष हा आपल्या पठडीतील हवा आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्षाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांंच्या जागेवर मर्जीतील नावे रेटली जाण्याची शक्यता आहे. भाजपा व शिवसेनेचा तरुणाईकडे असलेला ओढा पाहून काँग्रेसच्या गोटातही नवा जिल्हाध्यक्ष हा तरुणांमधूनच निवडला जावा, अशी भूमिका घेतली जात आहे.
त्यातही प्रदेशाध्यक्ष मराठा समाजाचे नेतृत्व करणारे असल्याने काँग्रेसचा आगामी जिल्हाध्यक्ष हा नॉन-मराठा आणि त्यातही आदिवासी, अल्पसंख्यक अथवा ओबीसी संवर्गातून द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी यवतमाळ जिल्ह्यातून दोन ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यासाठी दिल्लीत लॉबिंगही केले गेले. मात्र त्यात कदाचित त्यांचे प्रयत्न कमी पडले असावे म्हणून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शेजारील नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाणांकडे दिली गेली आहे. आता चव्हाणांकडेही जिल्ह्यातील गटांकडून लॉबींगची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गटबाजी फोफावली, नेत्यांच्या नावाने गटाची ओळख
माणिकराव ठाकरे आणि वामनराव कासावार यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात फोफावली. नेतेच एकमेकांच्या विरोधात असल्याचे पाहून कार्यकर्तेही विभागले गेले. जिल्ह्यात पक्ष काँग्रेस ऐवजी नेत्यांच्या नावाने (गटनिहाय) ओळखला जाऊ लागला. केंद्रीय नेते आमदार बाला बच्चन यांनीही दोन दिवसापूर्वी येथे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत या गटबाजीवर नाराजी व्यक्त करताना नेत्यांच्या नावाने पक्ष नव्हे तर पक्षाच्या नावाने नेते ओळले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.