महसूल राज्यमंत्र्यांनी गड राखला
By admin | Published: February 24, 2017 02:32 AM2017-02-24T02:32:24+5:302017-02-24T02:32:24+5:30
शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच सर्वकाही असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
दिग्रस मतदारसंघ : भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी चीत
यवतमाळ : शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच सर्वकाही असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
शिवसेनेने दारव्हा तालुक्यातील पाच, नेर तालुक्यातील तीन तर दिग्रस तालुक्यातील तीन अशा जिल्हा परिषदेच्या सर्व ११ जागा जिंकल्या आहेत. दिग्रस तालुक्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण माजी राज्यमंत्री संजय देशमुख काँग्रेस सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले. त्यामुळे दिग्रस तालुक्यात भाजपाला ‘परिवर्तन’ अपेक्षित होते. परंतु मतमोजणीच्या निकालाअंती हे ‘परिवर्तन’ भाजपासाठी फुसका बार ठरले. दिग्रसमधील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा सेनेने काबीज करीत भाजपाला धूळ चारली. देशमुखांना जिल्हा परिषदेची एकही जागा खेचून आणता न आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे वजन घटल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. कालचा काँग्रेसचा, आजचा भाजपाचा संजय नव्हे तर शिवसेनेचाच संजय राजकारणात भारी असल्याचे राठोड यांनी दाखवून दिले आहे. दिग्रसच नव्हे तर नेर व दारव्हा तालुक्यातही शिवसेनेने अन्य कुणाला खाते उघडू दिले नाही. विद्यमान सभापती व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गजांना तेथे सेनेने पराभूत केले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळातही शिवसेनेने जिल्हा परिषदेचे चार पैकी दोन जागांवर विजय मिळविला. या दोन जागा सेनेने भाजपाकडून खेचून आणत आपणच वरचढ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. पंचायत समित्यांमध्येसुद्धा शिवसेनेची सरशी राहिली. दिग्रसमध्ये सहा पैकी तीन, दारव्हामध्ये १० पैकी नऊ तर नेरमध्ये पंचायत समितीच्या सहा पैकी पाच जागा सेनेने जिंकल्या. संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपालाही चित केले. शिवसेनेकडून निवडणूक प्रचारासाठी कुणीही स्टार प्रचारक आले नव्हते. संजय राठोड यांनी खासदार भावनाताई गवळी व संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्यासह स्टार प्रचाराकाची भूमिका वठवून जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २० जागा मिळवून दिल्या. शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांनी पाटणबोरीपासून उमरखेडपर्यंत ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन शिवसैनिकांना ताकद दिली. प्रचारात त्यांची साथ लाभल्याने सेनेने जिल्हा परिषदेचा गड सहज सर केला.
पालकमंत्री पद काढल्याने ना. राठोड यांनी हीच निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना शिवसैनिकांचीही तेवढीच समर्थ साथ लाभली. (जिल्हा प्रतिनिधी)