एचआयव्ही मुक्ततेसाठी राज्यभर प्रबोधन
By admin | Published: June 13, 2014 12:33 AM2014-06-13T00:33:29+5:302014-06-13T00:33:29+5:30
एचआयव्हीमुक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी औरंगाबाद येथील आदेश आटोटे या तरुणाने मोटरसायकलवरून शहरी तथा ग्रामीण भागात जनजागरण सुरू केले आहे.
यवतमाळ : एचआयव्हीमुक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी औरंगाबाद येथील आदेश आटोटे या तरुणाने मोटरसायकलवरून शहरी तथा ग्रामीण भागात जनजागरण सुरू केले आहे. २० मे रोजी त्याचे हे अभियान सुरू असून आदेश नुकताच यवतमाळात दाखल झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एचआयव्ही एड्सबाबत तो जनजागरण करणार आहे.
मूळचा मुर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी असलेला आदेश मोटरसायकलने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार आहे. २० मे रोजी सुरू झालेल्या या अभियानाचा १ डिसेंबर जागतिक एड्स दिनी औरंगाबाद येथे समारोप होणार आहे. आदेश आटोटे हा संगीत शिक्षक आहे. त्याने इंदोर येथील भैय्यू महाराजांच्या आश्रमात २००८ मध्ये भजनसंध्या या कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. या कार्यक्रमामध्ये पुणे येथील एचआयव्हीग्रस्त लहान बालकेसुद्धा सहभागी झाली होती. एचआयव्हीग्रस्त बालकांच्या वाट्याला आलेल्या वेदना पाहून आदेश हळहळला. त्याच्या मनातील कलावंत त्याला स्वस्थ बसू देईना.
मानवीय दृष्टिकोनातून त्याने एचआयव्हीग्रस्त बालकांच्या बालगृहात सेवासुद्धा दिली. हे काम करीत असतानाच एचआयव्हीबाबत जनजागरण करून संपूर्ण देश एचआयव्हीमुक्त व्हावा, हा संकल्प त्याने केला. यासाठी जनजागरण यात्रेचे स्वयंस्फूर्तीने आयोजन केले. सहा वर्षाच्या कालावधीत एचआयव्ही या जीवघेण्या आजाराने १२३ जणांचा झालेला मृत्यू त्याने अनुभवला. रुग्णांच्या बाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर व्हावे म्हणून आदेश आटोटे याने गावागावात प्रचार अभियान सुरू केले. सुरुवातीला सायकलद्वारे प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या अभियानामागील प्रामाणिक सामाजिक उद्देश लक्षात घेता त्याच्या मित्राने मोटरसायकलद्वारे प्रचार करण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हेतर लोकवर्गणीतून आदेशला मोटरसायकल घेवून देण्यात आली. त्याच्या या कार्यात कचरा उचलणाऱ्या महिलांनीही आपल्या श्रमातील रक्कम दिली. औरंगाबाद, जालना, देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आदी शहरांमध्ये त्याने एड्सबाबत असलेल्या भ्रामक कल्पना व समजुतींवर आपल्या वाणीतून प्रकाश टाकला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात तो आता जनजागरण करणार आहे.
(शहर प्रतिनिधी)