दिग्रसमध्ये आदिवासी समाजाचे ठाणेदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:59+5:302021-08-13T04:47:59+5:30
दिग्रस : आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा ...
दिग्रस : आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा क्रांती दल, बिरसा ब्रिगेड, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेसह तालुक्यातील समाजबांधवांनी ठाणेदार सोनाजी आम्ले यांना दिले.
जागतिक आदिवासी दिन समाजबांधव उत्साहात साजरा करतात. या दिवशी फेसबुकवर आनंदराव डवले, रा. महागाव यांनी शुभेच्छापर पोस्ट टाकली असता तुपटाकळी येथील गोपाल ढोरे याने अश्लील शब्द व भडकावू पोस्ट टाकून संपूर्ण आदिवासीबांधवांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे समाजबांधवांत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्याचा सर्वत्र निषेध केला. त्याला तातडीने अटक करून ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ महासचिव डॉ. आरती फुपाटे, जिल्हा उपाध्यक्ष बी.टी. कन्नाके, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सिडाम, नगरसेवक वसंत मडावी, अनिल पेंदोर, भीमराव खारोडे, नारायण कराळे, दिलीप जवादे, एम.एम. उइके, उत्तम सोळंके, विनोद नाटकर, एम.आर. सोळंके, भारत मेसराम, धीरज आडे, संदीप बोरकर, गजानन पवार, श्याम ससाणे, संगीत पवार यांच्यासह शेकडो समाजबांधव निवेदन देताना उपस्थित होते.
दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तुपटाकळी येथील गोपाल ढोरे याला ताब्यात घेतले.