आदिवासी गावातून घडला राज्याचा कामगार आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:10 PM2018-03-04T22:10:10+5:302018-03-04T22:10:10+5:30
गरिबीत गुणवत्ता जन्म घेते. माणूस प्रयत्न करू लागला तर संकटे संधी बनतात. पांढरकवडा तालुक्याच्या आदिवासीबहुल गावातील नरेंद्र पोयाम नावापुढे आज ‘आयएएस’ ही पदवी लागली......
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : गरिबीत गुणवत्ता जन्म घेते. माणूस प्रयत्न करू लागला तर संकटे संधी बनतात. पांढरकवडा तालुक्याच्या आदिवासीबहुल गावातील नरेंद्र पोयाम नावापुढे आज ‘आयएएस’ ही पदवी लागली, ती केवळ आणि केवळ जिद्द आणि मेहनतीमुळेच. मुंझाळा गावात सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला नरेंद्र आज मुंबईत कामगार आयुक्त झालाय. मुंझळा ते मुंबई हा त्यांचा प्रवास रोचक आहे आणि जिल्ह्यासाठी प्रेरकही!
मुंझाळा हे पांढरकवडा तालुक्यातील एक दुर्लक्षित गाव. उणीपुरी एक हजार लोकसंख्या. याच गावात १९६० मध्ये कृष्णराव पोयाम या शेतकºयाच्या पोटी गुणवान मुल जन्मास आले. नरेंद्र. शेतीवर जगणाºया या कुटुंबात अडचणींची श्रीमंती होती. आई इंदूबाई यांच्या मृत्यूनंतर तर नरेंद्र एकाकी पडला. पण शिकण्याची जिद्द सोडली नाही. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत सातवी पास केल्यावर नरेंद्र करंजीच्या शाळेत शिकायला गेला. पण दररोज दहा किलोमीटर पायी चालत जावूनच त्याला शिकावे लागले. दहावीपर्यंत शिकल्यावर पांढरकवड्यात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, तेही पायपीट करूनच. या हालअपेष्टा नरेंद्रला खूप काही शिकवून गेल्या. म्हणूनच पदवीनंतर थेट नागपूर गाठून त्यांनी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
ग्रामीण भागातील अनुभवांची शिदोरी घेऊन आलेले नरेंद्र पोयाम नागपूरच्या महाविद्यालयीन जीवनात कर्तृत्व गाजवू लागले. याच दरम्यान त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांविषयी आकर्षण निर्माण झाले. परंतु, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे ही आपल्या आवाक्यातील गोष्ट नाही, असे त्यांना वाटायचे. कित्येक वेळा तर त्यांनी जाहिरात पाहूनही परीक्षेचा अर्जच भरला नाही. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करणारेही कुणी नव्हते. शेवटी स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी अर्ज भरला. पहिली परीक्षा पास केली. दुसरीही उत्तीर्ण केली. मुलाखतीत अडखळले. पुरेशा तयारीनिशी ते उतरले नव्हते. पण आता आत्मविश्वास वाढला होता. त्या बळावर त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि सर्व पातळ्यांवर यशस्वी झाले. अवघ्या २५ व्या वर्षी मुंझाळ्याचा साधा सरळ नरेंद्र उपजिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम बनले.
१९८५ मध्ये पहिल्यांदा अकोल्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले नरेंद्र पोयाम यांनी नंतर अवघ्या महाराष्ट्रात विविध पदे भूषविली. अमरावती, बुलडाणा, यवतमाळ येथेही उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. कृषी विद्यापीठाचे कुलसचिव, नागपूरचे उपायुक्त, भंडारा-उस्मानाबादचे सीईओ, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अशा महत्त्वपूर्ण जबाबदाºया पार पाडताना त्यांनी आपल्या कार्यशैलीची छाप सोडली. पुणे येथे अपंग कल्याण आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वाची ठरली. तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथेही आयुक्त म्हणून त्यांनी संशोधन कार्याला नवी दिशा दिली. आता मुंबई येथे कामगार आयुक्त म्हणून ते रूजू झाले आहेत. त्यांच्या या भरारीतून पांढरकवडा तालुक्याचीच नव्हेतर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे.
शाळा महत्त्वाची नाही, शिक्षण महत्त्वाचे
मुंझाळा (ता. पांढरकवडा) येथील नरेंद्र पोयाम आज कामगार आयुक्त म्हणून कामगिरी बजावत आहेत. ते म्हणाले, मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो. तरी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालो. यशस्वी होण्यासाठी इंग्रजी शाळेतच गेले पाहिजे असे नाही. जाणीवपूर्वक शिक्षण घेणे महत्त्वाचे असते. ग्रामीण विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे, त्याविषयी स्वत:शीच ‘कमिटमेंट’ करावी आणि प्रामाणिक मेहनत घ्यावी, असे आवाहन कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.