जमात-ए-इस्लामी हिंदचे राज्यव्यापी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:07 PM2018-01-13T22:07:56+5:302018-01-13T22:08:11+5:30
सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, अशी खंत जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद इकबाल मुल्ला यांनी व्यक्त केली.
यवतमाळात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोहम्मद इकबाल मुल्ला म्हणाले, देशात विकास आणि उद्योजकता वाढण्याऐवजी प्रत्येक क्षेत्रात देश मागे जात आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे जमात-ए-इस्लामी हिंद संघटना आता १२ ते २१ जानेवारी या कालावधीत सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविणार आहे. ‘इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी’ अशी या अभियानाची संकल्पना आहे. संघटनेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जनतेत जाऊन मुस्लीम समाजाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. असे कार्यक्रम यापूर्वीही घेण्यात आले, तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध जातीसमुहांनी त्या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळीही राजकीय, सामाजिक, सहिष्णुतावादी संघटना आणि विचारवंतांना जमात-ए-इस्लामी हिंद संघटना सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण, रोजगार आणि जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण होऊन सर्वांना समान संधी मिळाली तरच देशाचा विकास होईल. परंतु, आज १७ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. महाराष्ट्रात तर २२ टक्के लोक आर्थिक दुर्बल आहेत. मुंबईतील धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. अशा अभिमानाने देशाचा विकास कसा होईल? समाज कल्याण विभागाचे बजेट जेमतेमच आहे. अनेक जिल्हे आजही कुपोषणग्रस्त आहेत. अशा सर्व वंचित घटकांना एकत्र आणण्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंद अभियान राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद इकबाल मुल्ला, प्रसार विभागाचे सचिव इम्तियाज शेख, यवतमाळ शहराध्यक्ष अजमत उल्ला खान, वाजीद उल्ला खान आदी उपस्थित होते.
असे राबविणार अभियान
‘इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान १२ ते २१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांचे सात गट तयार करण्यात आले. हे कार्यकर्ते ३६ जिल्ह्यांमध्ये फिरून ६०० ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत. विविध भागातील लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. अभियानाच्या १४ लाख पत्रिकांचे वितरण केले जात आहे. शिवाय सोशल मीडियाद्वारे एका आठवड्यात ५० लाख लोकांपर्यंत शांतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.