थोरांचे पुतळे होर्डिंगच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:06 AM2018-08-08T00:06:25+5:302018-08-08T00:07:48+5:30
थोर पुरुषांच्या चरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु शहरात थोरांच्या पुतळ्यांना आता प्रसिद्धीलोलूप तथाकथित समाज सेवकांच्या होर्डिंगचा गराडा पडला आहे. यामुळे पुतळ्यासह शहराचेही विद्रूपीकरण होत असताना नगरपालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : थोर पुरुषांच्या चरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु शहरात थोरांच्या पुतळ्यांना आता प्रसिद्धीलोलूप तथाकथित समाज सेवकांच्या होर्डिंगचा गराडा पडला आहे. यामुळे पुतळ्यासह शहराचेही विद्रूपीकरण होत असताना नगरपालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे.
पुसद नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून बसस्थानक चौकात थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. मात्र सध्या या पुतळ्याच्या अवतीभवती मोठे होर्डिंगस लावण्यात आले आहे. तर पुतळ्यासमोरच फुटपाथवर फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या सर्व गर्दीत महात्म्याचा पुतळाच दिसेनासा होतो की काय अशी भीती सुज्ञ नागरिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे समाज भावना दुखावल्या जात असून नगरपालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.
महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे तसेच या ठिकाणी बॅनर लावण्यावर बंदी आणावी, अशी मागणी येथील माळी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, जिल्हाधिकारी, आमदार मनोहरराव नाईक, आमदार अॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा आदींना निवेदनही देण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडे यापूर्वीही वेळोवेळी अर्ज देण्यात आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नगरपरिषद पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवून यापुढे कोणतेही बॅनर लावू नये, अशी मागणी होत आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा माळी समाज संघटनेचे आत्माराम जाधव, गजानन इंगळे, संदीप भोने, डॉ. रोहित राऊत, मुरलीधर जाधव, राजेश जाधव, शुभम इंगोले, राहुल काशीनंद, गजेंद्र मोरे, सुनील गवळी, देविदास झरकर, संजय भोने, प्रा.धनंजय कोठाळे, दीपक चिपडे आदींनी दिला.