कृत्रिम टाके नसल्याने मैदानात ठेवली बाप्पांची मूर्ती, यवतमाळ नगरपरिषदेचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 07:36 PM2019-09-10T19:36:47+5:302019-09-10T19:39:29+5:30
यवतमाळ - शहरातील गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र नगरपरिषदेने दहा दिवस उलटूनही कोणतीच ...
यवतमाळ - शहरातील गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र नगरपरिषदेने दहा दिवस उलटूनही कोणतीच कार्यवाही केली नाही. अखेर पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जागाच न मिळाल्याने एका भक्ताने चक्क बाप्पाला खुल्या मैदानात ठेवून दिले.
यवतमाळ शहरातील प्रभाग ५ मध्ये येणा-या आदर्शनगरात घडला. नगरपरिषदेने शहरात ३० कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन केले. दरवर्षीच कृत्रिम टाके व विहीर सफाईच्या नावाने निधी लाटला जातो. यावर्षीसुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होवूनही कुठेच कृत्रिम टाके दिसत नाही. प्रभाग ५ मध्ये आदर्शनगरच्या खुल्या मैदानात आणि संजय गांधी शाळेत कृत्रिम टाके प्रस्तावित होते. या प्रभागातील सार्वजनिक विहिरींवर गणपती विसर्जनाला पूर्णत: बंदी आहे. तेथील पाण्याचा नागरिक पिण्यासाठी वापर करतात. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करायचे कुठे हा प्रश्न घेऊन अनेकजण प्रभागाच्या नगरसेवक वैशाली सवाई यांच्याकडे पोहोचले. त्यांनीसुद्धा कृत्रिम टाके नसल्याने असमर्थता दर्शविली. अखेर एकाने गणपती बाप्पाची मूर्ती खुल्या मैदानातच ठेवून दिली. या गंभीर प्रकारामुळे संताप निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासन कोणतेच काम वेळेत करताना दिसत नाही.
गणपतीची स्थापना ही दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस अशा प्रकारे केली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण करणा-या बाप्पाचे विसर्जन भक्त त्यांच्या सोयीने करतात. यामुळे गणपतीची स्थापना होण्यापूर्वीच नगरपरिषदेने कृत्रिम टाके व इतर विसर्जनाच्या सोयींचे नियोजन करणे अपेक्षित होते. भ्रष्ट कारभारामुळे केवळ कागदोपत्री काम करण्यात तरबेज असलेल्या यंत्रणेने ही समस्या निर्माण केल्याचा आरोप प्रभागाच्या नगरसेवक वैशाली सवाई यांनी केला आहे. यापूर्वीसुद्धा विसर्जनाबाबत तातडीने उपाययोजना कराव्या, अशी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.