अधिकाऱ्यांच्या लेखी दरोडा सदृश्य स्थिती
By admin | Published: July 9, 2014 11:54 PM2014-07-09T23:54:55+5:302014-07-09T23:54:55+5:30
राखीव वनातील दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकडाची तस्करी करण्यात आली. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतरही ती हिवरी वनपरिक्षेत्र
हिवरी वनपरिक्षेत्र : दोनशेवर सागवान वृक्षांच्या तस्करीचे प्रकरण
यवतमाळ : राखीव वनातील दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकडाची तस्करी करण्यात आली. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतरही ती हिवरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चौकशी न लावता १५ दिवस दडपून ठेवली. आता प्रकरण अंगलट येईल, या भीतीने त्याची सावरासारव करण्यात येत आहे. त्यातूनच वृक्ष कत्तल आणि चोरीचे वेगवेगळ्या दिवशी पीओआर (चोरीची नोंद) फाडण्यात आले. एवढेच नव्हे तर ही घटना दरोडा सदृश्य आणि अचानकपणे तेही विशिष्ट वेळेत झाल्याचा युक्तीवाद हिवरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला आहे.
हिवरी वनपरिक्षेत्रातील राखीव वनात रस्त्याला लागूनच असलेली दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. तलावाच्या काठी त्यातही वन चौकीदाराच्या राहूटीजवळ पन्नासवर सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून त्याची कत्तल करणे हे काही एक-दोन दिवसांचे काम नाही. तस्करांच्या सात ते आठ जणांच्या टोळीने सतत आठ दिवस कुऱ्हाड चालवून या वृक्षांची कत्तल केली असावी. कत्तलीतील लाकडे ही १०० ते १२० सेंटीमिटर गोलाईची आणि सुमारे २० फुटाच्या उंचीची असावी हे थूटांवरून लक्षात येते. त्यामुळे या लाकडाची तस्करी करताना ट्रकचा वापर झाला आहे. ट्रकच्या चाकाच्या खुनाही राखीव वनाच्या हद्दीत त्याची साक्ष देत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकरण उजेडात आणल्यानंतर हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते आणि कर्मचारी खडबडून जागे झाले. सुमारे १५ दिवस या प्रकरणाची चौकशी दडपून ठेवणाऱ्या आरएफओ मोहिते यांनी एकाच वेळी वृक्ष चोरीचे पीओआर न फाडता वेगवेगळ्या दिवशी ते फाडायला लावले.
तसेच प्रकरण अंगलट येवू नये म्हणून वरिष्ठांच्या डोळ्यात धुळफेक करीत ही घटना दरोडा सदृश्य असल्याचे दर्शविण्याचा खटाटोप चालला आहे. दरोडा हा अचानक पडत असतो. त्यातही एकाचवेळी मुद्देमाल लुटून नेला जातो. सागवान वृक्षांच्या बाबतीत हे शक्य नाही. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकारीही त्यांचा हा युक्तीवाद मोडीत काढीत असल्याचे खुद्द वनवर्तुळातून सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)